Lucknow University professor arrested :लखनौ विद्यापीठात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र (झूऑलॉजी) विभागातील एक सहाय्यक प्राध्यापक परमजीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राध्यापकावर एका विद्यार्थिनीसोबत फोनवर अश्लील संभाषण केल्याचा आणि तिला परीक्षेचा पेपर लीक करण्याचे आमिष दाखवून फूस लावण्याचे प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या व्हायरल क्लिपमध्ये आरोपी बीएससी (BSc)च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीकडे लैंगिक सुखाची मागणी करत आहे. तो तिला 'डार्लिंग, मी तुझ्यासाठी परीक्षेच्या पेपरची व्यवस्था केली आहे, परीक्षेपूर्वी परत ये, मी तो तुला येथे देईन' असे म्हणत असल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ठाणे : बेपत्ता अरबाज खानची बॉडी गटारीतील हिरव्या ड्रममध्ये सापडली, पोलिसांकडून मोठा उलगडा!
या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची माहिती मिळताच विद्यार्थिनीने विद्यापीठ प्रशासनाकडे धाव घेऊन तक्रार केली. त्यानंतर तात्काळ पावले उचलत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विद्यानंद त्रिपाठी यांनी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली. या तक्रारीच्या आधारे हसनगंज पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी प्राध्यापक परमजीत सिंग याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे, प्राध्यापक सिंग याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विद्यापीठातील अंतर्गत राजकारणामुळे (इंटरनल पॉलिटिक्स) आपल्याला जाणीवपूर्वक अडकवले जात असून लक्ष्य केले जात असल्याचा दावा त्याने केला आहे. दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरू जे. पी. सैनी यांनी अंतर्गत तक्रार समितीला (आयसीसी) या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून 24 तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : पुणे : 'या' कारणामुळे हॉस्पिटलमध्ये ठेवला बॉम्ब, आरोपीचा धक्कादायक खुलासा
विद्यापीठाचे कडक धोरण आणि अंतर्गत चौकशीचे आदेश
लखनौ विद्यापीठ प्रशासनाने या घटनेनंतर एक प्रसिद्धीपत्रक जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यापीठाची प्रतिष्ठा आणि शैक्षणिक वातावरणाला हानी पोहोचवणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे प्रशासनाने ठामपणे सांगितले आहे. अशा गंभीर प्रकरणांमध्ये विद्यापीठ नेहमीच 'झिरो टॉलरन्स' नीतीचे पालन करते, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे विद्यापीठाच्या सुरक्षेवर आणि प्राध्यापकांच्या वर्तणुकीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून, अंतर्गत समितीच्या अहवालानंतर प्राध्यापकावर आणखी कायदेशीर आणि प्रशासकीय बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची उग्र निदर्शने अन् अटकेची मागणी
हा ऑडिओ क्लिपचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लखनौ विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप - ABVP) कार्यकर्त्यांनी आरोपी प्राध्यापकाला तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी विद्यापीठ कॅम्पसमध्ये जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली. अभाविपच्या लखनौ विद्यापीठ युनिटचे अध्यक्ष जय श्रीवास्तव यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. एवढ्या प्रतिष्ठित संस्थेत अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेला कोणतीही जागा नाही, असे ते म्हणाले. तसेच आरोपी प्राध्यापकावर लैंगिक छळ आणि परीक्षा प्रक्रियेच्या गोपनीयतेशी तडजोड केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्याची रवानगी थेट तुरुंगात झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणीही त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT











