Pune Crime : पिंपरी-चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) दुपारी काळाखडक परिसरातील एका लॉजवर भयानक घटना घडली. प्रियराने प्रेयसीचा चाकू आणि लोखंडी पानाने मारून तिचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मेरी मल्लेश तेलगु (वय 26, रा. देहूरोड) असं खून करण्यात आलेल्या प्रेयसीचं नाव आहे. तर दिलावर सिंग (वय 25, रा. पिसोळी, पुणे) असं प्रेयसीचा खून करणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे.
ADVERTISEMENT
चाकू आणि लोखंडी पानाचा वापर करून मेरीचा खून
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या माहितीनुसार, दिलावर सिंग आणि मेरी तेलगु यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, मेरीने दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असल्याची त्याला शंका होती. घटनेदिवशी दिलावर सिंग ने मेरीला वाकड येथील काळाखडक परिसरातील लॉजमध्ये बोलावले. तिथे तिचा मोबाईल तपासताना त्यात दुसऱ्या पुरुषासोबतचे फोटो सापडले. यामुळे संतापलेल्या दिलावर सिंगने सोबत आणलेल्या चाकू आणि लोखंडी पानाचा वापर करून मेरीचा खून केला.
प्रेयसीचा खून करुन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला
घटनेनंतर संशयित स्वतः पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात गेला आणि खून केल्याचे कबूल केले. कोंढवा पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली. तत्काळ वाकड पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि लॉजमधील खोलीत मेरीचा मृतदेह आढळला. मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. सातत्याने खून अन् कोयता गँगच्या घटना समोर येत आहेत. पुणे पोलीस गुन्हेगारीला आळा घालण्यास सपशेल अपयशी ठरल्याचं समोर आलं आहे. गृहमंत्र्यांनी पुण्यातील परिस्थितीवर लक्ष द्यावं, अशी मागणी देखील सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
