Crime News : राजस्थानमधील बिंदायका भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. प्रेस्टीज कॉलनीत एका 32 वर्षीय महिलेची तिच्याच 22 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरने निर्घृण हत्या केली आणि मृतदेह भाड्याच्या घराच्या बागेत पुरून टाकला. दोन महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या प्रवेश नावाच्या तरुणाने हे घर भाड्याने घेतले होते आणि मृत किरण हिला आपली पत्नी असल्याचे सांगितले होते.
ADVERTISEMENT
मातीतून बाहेर आला महिलेचा हात
या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश रविवारी (28 सप्टेंबर) सकाळी घर मालकामुळे झाला. घर मालक जेव्हा आपल्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी पोहोचला, तेव्हा घराला कुलूप असल्याचे दिसून आले. त्याने शेजाऱ्यांकडे चौकशी केली, मात्र प्रवेशबाबत काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर घर मालकाने घराच्या बागेकडे जाऊन पाहिले असता, तिथे ताजी खोदलेली माती दिसली. संशय आल्याने जवळ जाऊन पाहताच मातीतून महिलेचा एक हात बाहेर आलेला पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
हे ही वाचा : महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण, मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
तीन दिवसांपूर्वी हत्या
घर मालकाने तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने मृतदेह मातीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी प्रवेशने 2-3 दिवसांपूर्वीच महिलेची हत्या केली होती. त्यानंतर रात्रीच्या वेळी बागेत खड्डा करून मृतदेह पुरला आणि घराला कुलूप लावून तो तिथून फरार झाला.
हे ही वाचा : Antilia Bomb Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे तुरुंगातून येणार बाहेर, कोर्टाकडून मोठा दिलासा
आरोपीचा शोध सुरु
प्रवेश हा बिंदायका येथील एका कारखान्यात काम करत होता. सध्या पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली असून त्याचे लोकेशन शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील मृत महिलेच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचे कामही पोलीस करत आहेत. ही हत्या कोणत्या कारणातून झाली याचा पोलीस सर्व अंगांनी सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












