Crime News : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सादाबाद परिसरात रविवारी (27 सप्टेंबर) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. सादाबाद बायपास मार्गावरील एका घरात 58 वर्षीय माजी सैनिक शमशुद्दीन आणि त्यांची पत्नी सद्दो बेगम यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले. धारदार शस्त्राने गळा चिरून या दांपत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या दुहेरी हत्याकांडाची माहिती परिसरात पसरताच गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली होती.
ADVERTISEMENT
शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, शमशुद्दीन हे आपल्या पत्नीसोबत सादाबाद बायपास मार्गावरील घरात राहत होते. रविवारी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे संशय आल्याने शेजाऱ्यांनी नातेवाईकांच्या मदतीने दरवाजा उघडला. घरातील दृश्य पाहून उपस्थितांच्या पायाखालची जमीन सरकली. दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
हे ही वाचा : हातोडा, पक्कड, दोरी घेऊन तरुण नीलम गोऱ्हेंच्या बंगल्यात घुसला.., नेमकं काय घडलं?
हत्येचं कारण काय?
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. हत्येमागील मुख्य कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडे कसून चौकशी करत आहेत.
हे ही वाचा : तीव्र दुष्काळ असलेल्या भागांना दिलासा मिळणार? अंदाज काय?
तीक्ष्ण शस्त्राने हत्या
तपासाचा एक भाग म्हणून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत, जेणेकरून आरोपींचा माग काढता येईल. सकाळी 9 वाजता दांपत्याचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक दृष्ट्या तीक्ष्ण शस्त्राने भोसकून ही हत्या करण्यात आल्याचे दिसते. सर्व बाजूंनी तपास सुरू असून लवकरच या हत्याकांडाचा उलगडा करून आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT












