Accident News : नियतीचा खेळ किती क्रूर असतो याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आला आहे. एका अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या तीन मित्रांचा वाटेतच दुर्दैवी अंत झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या दुधाच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला इतकी भीषण धडक दिली की पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघातानंतर टँकरने या तिघांनाही सुमारे 100 मीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेले. या भीषण घटनेत 35 वर्षीय बलवान, 32 वर्षीय अजय कुमार आणि 29 वर्षीय सुरज या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ज्या घरातून हे तरुण हसत-खेळत बाहेर पडले होते त्याच घरावर आता शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुलाने 13व्या मजल्यावरून मारली उडी, फ्लॅटमध्ये आईचा कुजलेला मृतदेह.. दुहेरी मृत्यूने सोसायटीत घबराट
मैत्रीचा शेवट
हे तिघेही जिवलग मित्र होते. 60 वर्षीय प्रेमादेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी ते यमुना घाटाकडे निघाले होते. मात्र त्यांना तिथेपर्यंत पोहोचताच आले नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, टँकरचा वेग इतका प्रचंड होता की दुचाकीला धडक बसताच तिघे तरुण टँकरच्या चाकांखाली आले. माणुसकीला काळिमा फासणारी बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतरही चालकाने गाडी थांबवली नाही, उलट तो त्यांना चिरडत पुढे निघून गेला. तिघांच्याही शरीराची झालेली अवस्था पाहून उपस्थित हादरुन गेले.
ट्राफिक जाममुळे 10 किलोमीटरपर्यंत रांगा
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मृत तरुणांच्या नातेवाईकांसह स्थानिकांनी रस्त्यावर धाव घेतली. आपल्या पोटच्या गोळ्यांचा असा अंत झालेला पाहून पालकांनी हंबरडा फोडला. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखून धरला. जेव्हा पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने टँकर हटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भावनांचा उद्रेक झालेली माणसे क्रेनसमोर आडवी झोपली. यामुळे तब्बल तीन तास 10 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 'आमची मुले परत आणून द्या' या आर्त हाकेने संपूर्ण परिसर हेलावून गेला होता.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे, 6 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचं सावट
प्रशासनाचे आश्वासन आणि फरार आरोपीचा शोध
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस आयुक्त कृष्णकांत यादव आणि उप जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीडित कुटुंबांना सरकारी मदत आणि गृहयोजनेंतर्गत साहाय्य करण्याचे आश्वासन दिले, तेव्हा कुठे रास्ता रोको मागे घेण्यात आला. पोलिसांनी टँकर जप्त केला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. मात्र, एका बेजबाबदार चालकामुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ADVERTISEMENT











