Crime News : उत्तराखंडमधील मसुरी येथील एका होमस्टेमध्ये 27 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पी. राधा गायत्री असे या मृत महिलेचे नाव असून, ती गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत कार्यरत होती. मूळची विशाखापट्टणमची असलेली गायत्री तिच्या पतीसोबत 13 जून रोजी दिल्लीहून उत्तराखंडला सहलीसाठी आली होती. ऋषिकेशमध्ये काही वेळ घालवल्यानंतर हे जोडपे 14 जूनच्या रात्री एका होमस्टेमध्ये वास्तव्यास आले होते, जिथे ही दुर्दैवी घटना घडली.
ADVERTISEMENT
सात महिन्यांपूर्वी विवाह अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री आणि तिचा पती सौम्य श्रीचरण यांचा विवाह 8 नोव्हेंबर 2025 रोजी झाला होता. श्रीचरण देखील पुण्यातील एका आयटी कंपनीत कामाला आहेत. श्रीचरणने चौकशीदरम्यान सांगितले की, रविवारी (14 जून) रात्री त्यांनी मद्यप्राशन केले होते आणि पहाटे साडेतीनच्या सुमारास ते झोपले. मात्र, काही तासांनंतर जेव्हा तो जागा झाला, तेव्हा गायत्री रुममधील फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती आणि तिच्या तोंडातून व नाकातून रक्त येत होते. त्याने तातडीने होमस्टे व्यवस्थापनाला कळवले, परंतु वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा : कल्याण: हुंडा न दिल्यानं सुनेचं मुंडन केलं, उकळतं पाणी टाकून..
रुममध्ये मद्याच्या बाटल्या
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना 'ब्लिस' नावाच्या त्या रुममध्ये बेडशीटवर आणि इतर ठिकाणी रक्ताचे डाग आढळले आहेत. तसेच रुममध्ये मद्याच्या दोन रिकाम्या बाटल्या आणि अन्नपदार्थ मिळून आले आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, रुममध्ये कोणत्याही प्रकारच्या संघर्षाच्या खुणा होत्या की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या पती आणि होमस्टेमधील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा : 'मला तुझ्या आईच्या चेहऱ्यावर दु:ख बघायचंय...' 5 वर्षीय चिमुरडीसोबत काय घडलं?
पोस्ट मार्टम अहवालाची प्रतीक्षा
मृतदेहाचे शवविच्छेदन डेहराडूनमधील कोरोनेशन रुग्णालयात डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे केले जाणार असून, या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गायत्रीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून ते विशाखापट्टणमवरून उत्तराखंडला रवाना झाले आहेत. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. नवविवाहित तरुणीचा असा गूढ मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT











