Asha Bhosle Marriage : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातील चढ-उतारांविषयी चर्चा सुरु झाली आहे. आशाताईंनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला होता. मात्र हा त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत कठीण काळ होता. याविषयी काही वर्षांपूर्वी त्यांनी कविता छिब्बर यांना मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत आशाताईंनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि संघर्षाबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते.
ADVERTISEMENT
कुटुंबाचा विरोध आणि लतादीदींची नाराजी
कविता छिब्बर यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत आशा भोसले यांनी सांगितले की, 'मी खूप कमी वयात एका अशा व्यक्तीशी लग्न केले जे माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते.' हा प्रेमविवाह होता, मात्र आशाताईंच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबात मोठे वादळ निर्माण झाले. विशेषतः त्यांची थोरली बहीण, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या लग्नाला कडाडून विरोध केला होता आणि त्या बराच काळ आशाताईंशी बोलल्या नव्हत्या. आशाताईंच्या सासरचे कुटुंब अत्यंत जुनाट विचारांचे होते. एका 'गायिका' सुनेला स्वीकारणे त्यांना कठीण जात होते, ज्यामुळे आशाताईंना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.
हे ही वाचा : Asha Bhosale : वयाच्या दहाव्या वर्षी पहिले गाणे, सोळाव्या वर्षी लग्न, आशा भोसले यांचे आयुष्य नव्हते सोपे
लग्नानंतरचा छळ आणि कठीण काळ
आशा भोसले यांनी पुढे सांगितले की, त्यांचे पती गणपतराव भोसले त्यांना त्यांच्या माहेरच्या लोकांशी, विशेषतः लतादीदींशी बोलण्यापासून रोखायचे. दुसऱ्या मुलाच्या (हेमंत) जन्मानंतर परिस्थिती सुधारेल असे वाटले होते, पण तसे झाले नाही. आशाताईंनी अत्यंत भावूक होत सांगितले की, 'माझ्या नशिबी शारीरिक आणि मानसिक छळ आला. अखेर जेव्हा मी तिसऱ्यांदा गरोदर होते (मुलगा आनंद), तेव्हा मला घर सोडून जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मी पुन्हा माझ्या आईकडे आणि भावंडांकडे परतले.' एवढा त्रास सहन करूनही आशाताईंच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही. त्या म्हणतात की, जर त्या गणपतरावांना भेटल्या नसत्या, तर त्यांना त्यांची तीन गुणी मुले मिळाली नसती.
हे ही वाचा : 'सुरांची बाग उजाड झाली..' आशा भोसले यांच्या निधनाने फडणवीस भावूक; शरद पवारांसह अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या भावना
आर. डी. बर्मन यांच्याशी दुसरे लग्न
पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर, आशा भोसले यांच्या आयुष्यात संगीतकार आर. डी. बर्मन (पंचम दा) आले. बर्मन हे लग्नासाठी आशाताईंच्या मागेच लागले होते. अखेर 1980 मध्ये या दोघांनी विवाह केला. हे दोघांचेही दुसरे लग्न होते. पुढील काळात काही वैयक्तिक मतभेदांमुळे ते दोघे वेगळे राहू लागले असले, तरी त्यांच्यातील प्रेम आणि आदर कायम होता. 1994 मध्ये आर. डी. बर्मन यांच्या निधनापर्यंत त्यांचे नाते मैत्रीपूर्ण राहिले. आजही आशा भोसले यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, की कशा प्रकारे त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील संकटांवर मात करून संगीताच्या जगात आपले अढळ स्थान निर्माण केले.
ADVERTISEMENT











