मुंबई: गेली अनेक वर्ष रखडलेला मुंबईच्या उपनगरातील पत्रावाला चाळ प्रकल्प अखेर आता मार्गी लागला आहे. कारण आता राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी इमारतींचं पुर्ननिर्माण करणार आहे. याचाच भूमिपूजन सोहळा आज (22 फेब्रुवारी) पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याचवेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पत्रा चाळीच्या रहिवाश्यांना एक अटही घातली.
ADVERTISEMENT
‘एका जिद्दीने तुम्ही हा संघर्ष केलात. त्याला सरकारचं सहकार्य लाभलं. म्हणूनच मला असं वाटतं की, मुंबईत अनेकजण येत असतात. पोटापाण्यासाठी येत असतात. जिथे मिळेल तिथे राहतात. पण असं हक्काचं घर मिळाल्यानंतर कृपा करुन ते सोडून जाऊ नका. ही माझी अट आहे आणि विनंती सुद्धा आहे.’ असं यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:
‘अडचणीसुद्धा डोंगराएवढ्या असू शकतात. पण एकदा का विषय सोडवायचा म्हटलं की, तो सोडवला जाऊ शकतो. त्याचं हे एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे. मुंबईचं महत्त्व मी काही सांगायला नको. मुंबईत आपलं चांगलं सुंदर हक्काचं घर असावं ही जवळपास सगळ्या मुंबईकरांची इच्छा आहेच.’
‘आता पत्रावाला चाळ हा प्रकल्प किती जुना, त्यात काय-काय झालं याचा पाढा काय मी वाचत बसणार नाही. पण आजच्या शुभ मुर्हताच्या प्रसंगी मी एवढंच सांगेन की, चिकाटी-जिद्द असेल की सगळं काही होतं. आज आपण सगळेजण ज्या स्वप्नाची वाट पाहत होता त्याची आज सुरुवात होत आहे.
‘आज पत्रा चाळीचं भूमीपूजन होतं आहे. लवकरच घरं सुद्धा मिळतील. पण माझी एक अट नेहमी असते की, अशी हक्काची घरं जेव्हा आपण सरकार असो, महापालिका असो यांच्या माध्यमातून देत असतो तेव्हा माझी एक अट असते की, घर मिळविण्यासाठी तुम्ही जो संघर्ष केला आहे तो लक्षात ठेवा. तो संघर्ष कदापि विसरू नका.’
‘अनेक जण या क्षणाची वाट पाहत होते पण आपल्यातून निघून गेले. त्यांची आठवण ठेवा. ज्यावेळेला आपण आपल्या या हक्काच्या घरामध्ये पाऊल ठेवाल तेव्हा कृपा करुन हे घर सोडून, मुंबई सोडून जाऊ नका. नाहीतर हा संघर्ष, ही मेहनत वाया जाईल.’
‘एका जिद्दीने तुम्ही हा संघर्ष केलात. त्याला सरकारचं सहकार्य लाभलं. म्हणूनच मला असं वाटतं की, मुंबईत अनेकजण येत असतात. पोटापाण्यासाठी येत असतात. जिथे मिळेल तिथे राहतात. पण असं हक्काचं घर मिळाल्यानंतर कृपा करुन ते सोडून जाऊ नका. ही माझी अट आहे आणि विनंती सुद्धा आहे.’
‘पत्रावाला चाळीतील सर्व रहिवाशांना त्यांचं नवीन घर आता मिळणार आहे. याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. शुभेच्छा देतो. मात्र, एकच.. घर झाल्यानंतर.. जितेंद्र तुम्हीपण सांगायला पाहिजे की, आम्हाला निदान चहाला तरी बोलवा आपल्या घरी.. एवढीच एक अपेक्षा आहे.. बाकी काही नाही.’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांच्यामागे ED हात धुऊन का लागली आहे? पत्रा चाळ प्रकरण काय आहे?
दरम्यान, याच पत्रा चाळीच्या मुद्द्यावरुन भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांनी या पत्राचाळीच्या पुर्ननिर्माणात घोटाळा केल्याचा आरोप देखील किरीट सोमय्यांनी केला होता.
ADVERTISEMENT
