Maharashtra legislature monsoon session: ५० खोके एकदम ओके, शिंदे फडणवीस सरकारविरोधात विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई तक

• 06:41 AM • 17 Aug 2022

५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी आज विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजेच विरोधी पक्षांनी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून ही घोषणाबाजी केली. यामध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश होता. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि पक्ष नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान देत आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा […]

Mumbaitak
follow google news

५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी आज विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजेच विरोधी पक्षांनी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून ही घोषणाबाजी केली. यामध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश होता. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि पक्ष नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान देत आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा केला. त्यानंतर राज्यात घडलेलं सत्तानाट्य आपण पाहिलं आहेच. शिंदे फडणवीस सरकारचं पहिलं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे अशात महाविकास आघाडीने जोरदार घोषणाबाजी सरकार विरोधात केली.

हे वाचलं का?

अधिवेशन सुरू होण्याआधी काय घडलं?

महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी शिंदे फडणवीस सरकारविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गद्दार सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, ५० खोके एकदम ओके अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या. गद्दारांच्या सरकारचा धिक्कार असो अशाही घोषणा देण्यात आल्या.

मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत काय म्हटलं आहे?

विधान भवनात पोहचलेल्या गिरीश महाजन यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. आंदोलन आणि घोषणाबाजी करणारे सगळेच सध्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे या विरोधकांची अवस्था केविलवाणी आणि दीनवाणी झाली असल्याचं गिरीश महाजन म्हणाले. जनतेचं लक्ष विचलित व्हावं यासाठी अशी घोषणाबाजी ते करत आहेत असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

पावसाळी अधिवेशन घोषित झाल्यापासूनच ते वादळी होणार यात काहीही शंका नव्हती. २१ जूनला राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आलं. हे सरकार आल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन होतं आहे. या अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेच्या पायऱ्यांवरच ईडी सरकार म्हणत शिंदे फडणवीस सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

विधानभवनच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. त्यावेळी सत्ताधारी पक्षातले सुधीर मुनगंटीवार विधानभवनात जात असताना धनंजय मुंडे यांनी सुधीरभाऊंना कमी दर्जाचं खातं देणाऱ्या सरकारचा निषेध असो अशी घोषणा केली आणि सुधीर मुनगंटीवार यांना डिवचलं. तर संजय शिरसाट दिसताच धनंजय मुंडे यांनी संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान न देणाऱ्या सरकारचा धिक्कार अशाही घोषणा दिल्या.

    follow whatsapp