नागपूर : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातच भाजपच्या हाती भोपळा लागला आहे. १३ पैकी एकाही पंचायत समितीमध्ये भाजपचा सभापती होऊ शकलेला नाही. भाजपला फक्त तीन ठिकाणी उपसभापती पदावर समाधान मानावे लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश :
एका बाजूला भाजपचा दारुणं पराभव झाला असतानाच काँग्रेसला मात्र नागपूरमध्ये घवघवीत यश मिळाले आहे. जिल्ह्यातील १३ पैकी ९ पंचायत समित्यांवर काँग्रेसचे सभापती निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही ३ पंचायत समित्यांवर सभापती निवडून आणले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षालाही एका तालुक्यात यश मिळाले आहे. एका पंचायत समितीवर सभापती म्हणून निवडून आणण्यात शिंदे यांना यश मिळाले आहे.
दरम्यान, या विजयी निकालानंतर काँग्रेसनं भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना जोरदार टोला लागवला आहे. ट्विट करत काँग्रेसनं म्हटलं की, काल परवाच काँग्रेस संपवण्याची भाषा करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या जिल्ह्यातच १३ पंचायत समित्यांपैकी एकाही ठिकाणी भाजपचा सभापती न होऊ देत काँग्रेसनं भाजपचा सुपडासाफ केला. यापुढे आधी स्वतःचा जिल्हा सांभाळायचा आणि मग काँग्रेस संपवण्याच्या बाता मारायच्या! कळलं का चंद्रशेखर बावनकुळे? असाही खोचक सवाल काँग्रेसं विचारला.
काही दिवसांपूर्वीच गोंदिया इथं बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांना उद्देशून पंजाची आणि घडाळ्याची चिंता करण्याचा सल्ला दिला होता. तसंच कमळ आणि ढाल–तलवार हे दोन्ही मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला लढण्यासाठी उमेदवारही मिळणार नाही आणि हे तुम्ही माझ्याकडून लिहुन घ्या, असं आव्हान त्यांनी दिलं होतं.
काँग्रेसचे सभापती निवडून आलेल्या पंचायत समित्यांची नावं :
-
नागपूर ग्रामीण
-
कामठी
-
सावनेर
-
पारशिवनी
-
उमरेड
-
मौदा
-
कुही
-
भिवापूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती निवडून आलेल्या पंचायत समित्यांची नावं :
-
नरखेड
-
काटोल
-
हिंगणा
याशिवाय बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला रामटेक पंचायत समितीत सभापती पद मिळाले. तर रामटेक, कुही आणि मौदा तीन तालुक्यात भाजपला उपसभापती पद मिळाले आहे. यातील मौदा आणि कुही येथील उपसभापतीपद चिठ्ठ्या टाकून मिळाले आहे. निवडणुकांपूर्वी पडद्यामागील घडामोडींमध्ये भाजपतर्फे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना संपर्क करण्यात आल्याच्या चर्चा होत्या. मात्र निकालाअंती या चर्चा फोल ठरल्या आहेत.
ADVERTISEMENT
