उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. पंजाबमधून काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये मानहानीकारक पराभव झाला आहे. गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही काँग्रेसची निराशा झाली आहे. पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही जनादेश स्वीकारल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पाच राज्यातील निकालावर भूमिका मांडली. “निवडणूक निकालावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेस कार्यकारी समितीची लवकरात लवकर बैठक बोलावण्याचा निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला आहे. या बैठकीत चिंतन केलं जाईल,” असं सुरजेवाला यांनी सांगितलं.
‘तुम्हालाही काहीतरी करायचंय’; पंजाबचं तख्त जिंकताच केजरीवालाची भारतीयांना हाक
“उत्तर प्रदेशात काँग्रेस पुर्नजीवित करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, मात्र त्याचं मतांमध्ये परिवर्तन करु शकलो नाही. उत्तराखंड आणि गोव्यामध्येही आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवली, मात्र जनतेचं मन जिंकू शकलो नाही आणि बहुमताच्या आकड्यांपर्यंत पोहचू शकलो नाही”, असं सुरजेवाला म्हणाले.
मोबाईल रिपेअरिंगचं दुकान, बसमधून प्रवास करत प्रचार, कोण आहेत चन्नींना हरवणारे लभ सिंग?
“पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आमच्यासाठी धडा आहेत की आम्हाला लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज आहे. आम्ही पराभवाच्या कारणांवर चिंतन करू. पाच राज्यांमध्ये काँग्रेसच्या अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल आले. आम्हाला उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमध्ये चांगला निकाल येण्याची अपेक्षा होती. लोकांचा आशिर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरल्याचं आम्ही मान्य करतो,” असंही सुरजेवाला यांनी सांगितलं.
शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा मतदारांची NOTA ला पसंती, गोव्यात आघाडीची खिचडी शिजलीच नाही
राहुल गांधी काय म्हणाले?
पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “जनतेचा कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारला आहे. ज्यांना जनादेश मिळाला त्याचं अभिनंदन. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे आभार मानतो, ज्यांनी निवडणूक परिश्रम घेतले. आम्ही शिकू आणि भारतातील नागरिकांच्या हितांसाठी काम करत राहू” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मिळाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेत होती. निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने मोठे फेरबदल केले होते. मात्र, तरीही काँग्रेसला यश मिळू शकलं नाही. अंतर्गत वादांनीच काँग्रेसला शेवटपर्यंत ग्रासलं होतं.
ADVERTISEMENT
