Beed Crime News : बीड जिल्ह्यातील आणखी एका तरुणाचा दारू आणि संगीत बारीच्या नादात बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील औषध विक्रेता सतीश भागवतराव मुंडे (वय 37) यांचा मित्रांनीच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह त्याच गाडीतून घरी आणून टाकण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
सतीश मुंडे हे 12 फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रावर नाच-गाणे पाहण्यासाठी गेले होते. शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी यांच्या स्विफ्ट डिझायर कारने ते रवाना झाले. मार्गात साळेगाव येथील बारमध्ये तसेच कळंब आणि येरमाळा परिसरातील धाब्यावर सर्वांनी दारू पिल्याची माहिती आहे. रात्री साडेबारा वाजेपर्यंत ते कला केंद्रात होते. परत येताना मध्यरात्री दुसऱ्या गाडीतून आलेल्या ओळखीच्या काही तरुणांनी त्यांची गाडी अडवली. जुन्या वादाची कुरापत काढत सतीश मुंडे यांना छातीत आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
मृत्यू झाल्यानंतरही आरोपींनी सतीश यांना त्याच कारमधून रात्री सुमारे 1 वाजता साळेगाव येथील घरी आणले. घरी आल्यावर ते जास्त दारू पिल्याने बेशुद्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र वडिलांनी आवाज दिला असता कोणतीही हालचाल झाली नाही. त्यानंतर त्यांना केज उपजिल्हा रुग्णालयात आणि पुढे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सतीश मुंडे यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी सतीश यांचे वडील भागवत बळीराम मुंडे यांनी 15 फेब्रुवारी रोजी येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्दन गित्ते आणि दत्ता बाबासाहेब तोंडे (सर्व रा. साळेगाव) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान, सतीश मुंडे यांच्या पत्नी दीपाली या रात्रीपासून त्यांना फोन करत होत्या. फोन न उचलल्याने नातेवाईकांनाही संपर्क साधण्यात आला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अशी माहिती समोर आली आहे. सतीश मुंडे आणि दत्ता तोंडे यांच्यात 10-12 वर्षांपूर्वी वाद झाल्याची चर्चा असून त्याच कारणावरून ही मारहाण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकुलता एक मुलगा असलेल्या सतीश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि सात वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महिलेचा दीरावर जीव जडला! पतीचा काटा काढण्यासाठी लाखाची सुपारी; कुऱ्हाडीने वार करुन संपवलं
ADVERTISEMENT











