-मोहम्मद हुसेन खान
ADVERTISEMENT
ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे. एनसीबीकडून करण्यात आलेली ही कारवाई वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. आर्यन खानला घेऊन येणारा किरण गोसावी याच्यावर काही ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचं समोर आला आहे. किरण गोस्वामीनं दोन तरुणांना दीड लाख रुपयांना लुबाडल्याची दोन वर्षांपूर्वीची घटना आता उजेडात आली आहे.
आर्यन खान प्रकरणामधील NCB ने ज्याला साक्षीदार केलं आहे. तो किरण गोसावी फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा दावा पालघरमधील फसवणूक झालेल्या तरुणांनी केला आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणात साक्षीदार असलेला किरण गोसावी याने परदेशात कामाला लावतो असे सांगून अनेक तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.
आर्यन खानला ताब्यात घेणारे के.पी. गोसावी कोण?
पालघर तालुक्यातील एडवन या गावातील दोन तरुणांचीही किरण गोसावीने दोन वर्षापूर्वी फसवणूक केली होती. उत्कर्ष तरे व आदर्श किनी या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो, असं सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.
नवी मुंबई येथील कार्यालयातून तो हे रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो, असं सांगितल्यानंतर दोघांनीही गोसावीच्या बँक खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचं तिकीट व व्हिसा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचं तिकीट व व्हिसा बोगस असल्याचं उघड झालं.
त्या दोघांनाही शॉक बसला. इथून ते पुन्हा पालघर येथे आले. घरी परतल्यानंतर ते फसवणूक केल्याप्रकरणी केळवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली नाही. दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष यानं सांगितलं.
‘माझ्यासारख्या अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता असल्याची शक्यता आहे. आमच्या फसवणूक प्रकरणांमध्ये किरण गोसावी याला पोलिसांनी पकडून कायदेशीर कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा’, अशी अपेक्षा उत्कर्ष तरे याने ‘मुंबई तक’शी बोलताना व्यक्त केली.
ADVERTISEMENT











