मुंबई : डॉ. लाल पॅथलॅबमधील 12 कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह, महापालिकेनं लॅब केली सील

मुंबई तक

• 03:51 AM • 25 Dec 2021

मुंबई राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताना दिसत असून, मुंबईतील दादर परिसरात असलेल्या डॉ. लाल पॅथलॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असल्याची माहिती मिळाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पॅथलॅबचं कार्यालय सील केलं. मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंबईतील दादर परिसरात डॉ. लाल पॅथलॅबची शाखा आहे. येथील कार्यालयातील 12 कर्मचारी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताना दिसत असून, मुंबईतील दादर परिसरात असलेल्या डॉ. लाल पॅथलॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असल्याची माहिती मिळाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पॅथलॅबचं कार्यालय सील केलं.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंबईतील दादर परिसरात डॉ. लाल पॅथलॅबची शाखा आहे. येथील कार्यालयातील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर महापालिकेकडून तातडीने कार्यालय सील करण्यात आलं. त्याचबरोबर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

सर्वात आधी पॅथलॅबमध्ये कार्यरत असलेला ऑफिस बॉय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ऑफिस बॉयच्या संपर्कात 39 जण आल्याचं समोर आलं. त्यानंतर या सगळ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

39 जणांपैकी 12 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं. मुंबईत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्णही आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्व जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवण्यात आले आहेत.

त्याचबरोबर मागील काही दिवसांत ज्यांनी ज्यांनी लाल पॅथलॅबमध्ये जाऊन तपासण्या केल्या आहेत. त्या सर्वांना कोरोना चाचण्या करण्याची सूचना महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 88 वर

देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 358 वर पोहोचली आहे. यात महाराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 88 रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत 67, तेलंगानात 38, तामिळनाडूमध्ये 34, कर्नाटकात 31 आणि गुजरातमध्ये 30 रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईतील निर्बंधात वाढ

ख्रिसमस, नववर्षाचं स्वागत यापार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेनंही पावलं उचलत नववर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्या आणि कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.

    follow whatsapp