गडचिरोली : येथील एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवरील लोहखाण बंद करा अन्यथा, परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मारावबाबा आत्राम आणि प्रशासनाला देण्यात आली आहे. अधिवेशापूर्वीच नक्षलवाद्यांकडून अशा प्रकारची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. नक्षल्यांचा प्रवक्ता श्रीनिवास याने काढलेल्या पत्रकात ही धमकी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
श्रीनिवास याने काय म्हटलं आहे पत्रकात?
जिल्ह्यात सूरजागड टेकडीवर मागील वर्षभरापासून लोहखनिजाचं उत्खनन सुरू आहे. नुकतीच खाणीच्या विस्ताराबाबत जनसुनावणी घेण्यात आली. मात्र, स्थानिकांचा विरोध झुगारून सरकार उत्खनन करत आहे, त्यामुळे उत्खनन तत्काळ बंद करावं, अन्यथा बघून घेऊ, परिणाम भोगावे लागतील.
सूरजागड परिसरात आदिवासींच्या पारंपरिक देवी देवतांचं अस्तित्व आहे. त्या भागात दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. मात्र, लोहखाणीमुळे या भागाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट सुरू आहे. अवजड वाहतुकीमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. टेकडीवरील गाळ शेतात आणि नदी-नाल्यात साचत आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
यामुळे अजय टोप्पो या आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केली. परंतु सरकार आणि कंपनी पोलीस बळाचा वापर करून लोकांचा विरोध दडपण्याचा काम करीत आहे. विरोध करणाऱ्या स्थानिकांना तुरुंगात डांबण्यात आले. पांडू नरोटेला सुध्दा याच कारणांमुळे देशद्रोहाच्या कलमाखाली अटक करण्यात आली. तुरुंगात त्याचा मृत्यू झाला.
आम्ही सुरुवातीपासूनच याला विरोध करीत आहो. यासाठी कंपनीच्या एका अधिकाऱ्याची हत्या केली, वाहनांची जाळपोळ केली. पण शासनानं ठिकठिकाणी पोलीस केंद्र उभारून बळजबरीनं खाणीचं काम सुरू केलं. आता खाणीचा विस्तार करण्यात येणार आहे. हा सर्व प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. खाणीचे काम तत्काळ बंद न केल्यास परिणाम भोगण्यास तयार रहा.
धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर आगपाखड :
दरम्यान, सूरजागड लोहखाणीचे काम सुरू करण्यामागे स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. यात त्यांच्याविरोधातही आगपाखड केली आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही आमदार आणि त्यांचे सहकारी खाणीच्या समर्थनात होते. त्यांनी हे सर्व कामे बंद न केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी नक्षवाद्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
