ठरलं! ११ डिसेंबरला PM मोदींच्या हस्ते ‘समृद्धी’चं उद्घाटन; नागपूर मेट्रो-२ चंही लोकार्पण

मुंबई तक

• 11:48 AM • 30 Nov 2022

नागपूर : बहुप्रतिक्षीत मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा अखेर मुहुर्त ठरला आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. याचवेळी त्यांच्या हस्ते या महामार्गाच उद्घाटन होणार आहे. तसंच यावेळी नागपूर मेट्रो फेज-२ चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यासाठी नागपूर प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. यंदा विधिमंडळाचं […]

Mumbaitak
follow google news

नागपूर : बहुप्रतिक्षीत मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा अखेर मुहुर्त ठरला आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. याचवेळी त्यांच्या हस्ते या महामार्गाच उद्घाटन होणार आहे. तसंच यावेळी नागपूर मेट्रो फेज-२ चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यासाठी नागपूर प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

यंदा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार असून त्यापूर्वीच समृद्धी महामार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसंच आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी २ मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण करुन नागपुरमध्ये आणि त्यातही विदर्भामध्ये मोठं राजकीय लाभ मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

सृमद्धी महामार्गाच्या नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार या २१० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याच उद्घाटन १ मे रोजी करण्यात येणार होतं. तशी घोषणाही ‘एमएसआरडीसी’ने केली होती. मात्र नागपूरजवळ प्राण्यांच्या ओव्हरपासचा गर्डर कोसळल्यानं हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं. गर्डर कोसळलेल्या ओव्हरपासचे काम पूर्ण करून महामार्गाचे उद्घाटन केले जाईल, असं सांगितलं गेलं.

त्यानंतर पहिल्या टप्प्याचे उद्घाटन १५ ऑगस्टला केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र १५ ऑगस्टचा मुहूर्तही हुकला. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग लवकरच खुला होणार असल्याचे दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. तसंच या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. अखेर आता समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी या पहिला टप्प्याचा शुभारंभ होणार आहे.

    follow whatsapp