Prashant Kishor आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राला झाली चार राजकीय भेटींची आठवण

मुंबई तक

• 03:19 PM • 11 Jun 2021

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले चाणक्य अशी ओळख असणाऱ्या शरद पवारांना भेटले. या दोघांमध्ये सुमारे साडेतीन तास चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली नसती तरच नवल. नुकतेच बंगाल निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या विजयाचं श्रेय रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांनाच जातं. अशात प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची घेतलेली भेट अराजकीय होती असं […]

Mumbaitak
follow google news

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले चाणक्य अशी ओळख असणाऱ्या शरद पवारांना भेटले. या दोघांमध्ये सुमारे साडेतीन तास चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली नसती तरच नवल. नुकतेच बंगाल निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या विजयाचं श्रेय रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांनाच जातं. अशात प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची घेतलेली भेट अराजकीय होती असं सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच ही माहिती दिली. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचेही संकेत दिले आहेत.

हे वाचलं का?

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर पहिला कयास लावला जातो आहे तो म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रीय रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने ही भेट झालेली असू शकते. त्याची ही सुरूवात आहे असं बोललं जातं आहे. पश्चिम बंगालमध्ये जो अंदाज वर्तवण्यात आला होता तो अगदी परफेक्ट ठरला. त्यामुळे आता महाराष्ट्र आणि देशातही प्रशांत किशोर कशी रणनीती आखून देऊ शकतात का? त्यासाठीही प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा झालेली असू शकते. मात्र ही केवळ शक्यता आहे कारण प्रशांत किशोर यांनीच हे स्पष्ट केलं आहे की यापुढे ते रणनीतीकार म्हणून काम करणार नाहीत.

NCP चा वर्धापन दिन 10 जूनला पार पडला. यावेळी झालेल्या भाषणात शरद पवार यांनीच एक बाब स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालणार. या सरकारच्या भवितव्याबाबत मला चिंता वाटत नाही. एवढंच नाही तर 2024 मध्येही शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येऊन निव़डणूक लढवतील. त्यांनी हे वक्तव्य करून 24 तासही उलटत नाहीत तोच प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट झाली. मात्र प्रशांत किशोर महाराष्ट्रात येण्याची ही पहिली वेळ नाही. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेसाठी प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधला होता. प्रशांत किशोर यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रचाराचंही काम पाहिलं होतं.

एवढंच नाही तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील प्रशांत किशोर यांच्या संपर्कात होत्या. त्यांची अशी इच्छा होती की NCP चं कँपेनिंग हे प्रशांत किशोर यांनी करावं. मात्र त्यावेळी शरद पवार हे मात्र यासाठी तयार नव्हते. एका पारंपारिक राजकारण शैलीवर विश्वास ठेवणारे शरद पवार हे प्रोफेशनल राजकीय रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांची निवड करण्यास नकार दिला होता. मात्र आत्ताची स्थिती तशी नाही.

बहुचर्चित बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांचा करीश्मा आणि देशातल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी असलेले त्यांचे चांगले संबंध यामुळे प्रशांत किशोर यांचं महत्त्व वाढलं आहे. 2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशांत किशोर चर्चेत आले आहेत. हीच बाब शरद पवार यांनीही हेरली आहे. मात्र या भेटीमुळे पाच बैठकांची चर्चा सध्या महाराष्ट्रात रंगली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा घडवणाऱ्या या पाचपैकी एक बैठक कथित आहे.

शरद पवार-अमित शाह यांच्यात झालेली बैठक

या बैठकीलाच कथित म्हटलं जातं आहे. मात्र या बैठकीची चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगली होती. हे दोन्ही नेते एकाच वेळी एका शहरात होते. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी काही बैठक झाल्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत. तर अमित शाह यांनी या बैठकीबाबत नरो वा कुंजरोवा अशी भूमिका घेतली आहे. ही कथित बैठक झाल्यानंतर ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी झाली होती अशी चर्चा रंगली होती. या बैठकीनंतर सुमारे दोन महिने शरद पवार आरोग्याच्या कारणामुळे राजकीय घडामोडींपासून दूर होते.

देवेंद्र फडणवीस-शरद पवार

शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भेटले होते. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली होती. शऱद पवार यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र या भेटीची चर्चा चांगलीच रंगली होती. कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिलं होतं. फडणवीस एवढंही म्हणाले होते की आता महाराष्ट्रात शरद पवारांचं राजकारण संपलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली खरमरीत टीका हे देखील एक कारण होतं की ज्यामुळे भाजपची साथ राष्ट्रवादीने दिली नाही असंही बोललं गेलं. गोपीनाथ मुंडेंच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे एकटे असे नेते आहेत ज्यांनी थेट शरद पवारांवर टीका केली. अशात 2019 मध्ये ज्या गोष्टीमुळे पवार नाराज झाले होते ती नाराजी दूर कऱण्यासाठी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटले अशा चर्चा रंगल्या होत्या.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातली भेट

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची तक्रार उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे केल्याचं बोललं गेलं. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी असं काही झाल्याच्या चर्चा नाकारल्या. मात्र दोन्ही पक्षांनी एकच भूमिका घेतल्याने दोघांमध्ये नक्कीच काहीतरी खटके उडाले आहेत असंही बोललं गेलं. या सगळ्या प्रकरणाकडे पवार-अमित शाह यांच्या कथित बैठकीशीही जोडण्यात आलं. मात्र या बैठकीला काही दिवस होत नाहीत तोच झाली आणखी एक बैठक.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक

7 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाणही हजर होते. मात्र या बैठकीच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दहा मिनिटांसाठी वैयक्तिक भेटही झाली. यावरूनही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.

महाराष्ट्रात आणि देशात आता कोरोनाची लाट ओसरली आहे. राजकीय नेते एकमेकांना भेटत असतातच. मात्र 2019 च्यानंतर जसं महाराष्ट्रातलं चित्र बदललं आहे त्यावरून विविध संदर्भ या बैठकांना असतात. या पाच बैठकांची चर्चा चांगलीच रंगली होती हे आपल्याला पाहण्यास मिळालं.

    follow whatsapp