मुंबईत भाजपला पडणार खिंडार?; शिवसेना नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

मुंबईत महापालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेबरोबर इतर राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपापले पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीआधीच मुंबई भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे 15-20 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असून, डिसेंबरनंतर प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी हा दावा केला […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:04 PM • 19 Oct 2021

follow google news

मुंबईत महापालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेबरोबर इतर राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपापले पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीआधीच मुंबई भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे 15-20 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असून, डिसेंबरनंतर प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी हा दावा केला आहे.

हे वाचलं का?

राजकीय पक्षांना इतर महापालिकांबरोबरच मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध लागले असून, भाजप राजकीय भूकंप होण्याचे संकेत आहेत. याबद्दल शिवसेनेचे नेते आणि महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मोठं विधान केलं आहे.

भाजपचे 15-20 नगरसेवक पक्षा नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

काय म्हणाले यशवंत जाधव?

‘मी सांगतो आहे की, मुंबई महापालिकेत असलेले भाजपचे काही नगरसेवक त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. नेतृत्वाचा मनमानी कारभार. त्यांना कुठेही विचारात न घेणं. त्यांना डावलल्यामुळे त्यांची निराशा होत आहे. परिणामी अशी मंडळी निश्चितपणे वेगळा विचार करत आहेत. त्याचा जो निकाल आहे तो डिसेंबरला मुंबई शहराला कळेल. भाजपची ही मंडळी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जे नेतृत्व आहे ते त्यांना जुमानत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी त्यांना शिवसेनेचा आधार वाटत आहे’, असं जाधव यांनी म्हटलं आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी असली, तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. तसे संकेत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले आहेत. महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढेल, असं राऊत म्हणालेले आहेत. मात्र, अंतिम निर्णय निवडणुकीच्या आधी घेतला जाणार आहे.

    follow whatsapp