Shiv sena : ३ नाव आणि ३ चिन्हांच्या पर्यांयांसह ठाकरे मैदानात! चेंडू आयोगाच्या कोर्टात

मुंबई तक

• 12:15 PM • 09 Oct 2022

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर नवीन पर्याय देण्याचे आदेश शिंदे आणि ठाकरे गटाला दिले होते. त्यानुसार आता उद्धव ठाकरे गटाकडून ३ नाव आणि ३ चिन्ह अंतिम करण्यात आली आहेत. याबाबतचे पत्र ठाकरे गटाची बाजू मांडणारे सर्वोच्च न्यायालयातील ऑन रेकॉर्ड वकील विवेक सिंग यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. विवेक सिंग यांनी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर नवीन पर्याय देण्याचे आदेश शिंदे आणि ठाकरे गटाला दिले होते. त्यानुसार आता उद्धव ठाकरे गटाकडून ३ नाव आणि ३ चिन्ह अंतिम करण्यात आली आहेत. याबाबतचे पत्र ठाकरे गटाची बाजू मांडणारे सर्वोच्च न्यायालयातील ऑन रेकॉर्ड वकील विवेक सिंग यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.

हे वाचलं का?

विवेक सिंग यांनी दिलेल्या पत्रानुसार, ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. तर नावांसाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावांचा पर्याय सुचविण्यात आला आहे. नाव आणि चिन्हाबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंतीही आयोगाला करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या यादीत या चिन्हांचा समावेश नाही :

निवडणूक आयोगाने मुक्त चिन्हांच्या यादीमधील ३ चिन्हांचे पर्याय सुचविण्यास सांगितले होते. मात्र ठाकरे गटाने दिलेले चिन्हांचे तीनही पर्याय आयोगाच्या यादीत नाहीत. शिवाय ठाकरे गटाने सुचविलेल्या पर्यायांमध्ये त्रिशूळचा समावेश आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक चिन्हांच्या वापरावरुन आयोगाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने सुचविलेले पर्याय मान्य होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) नाव मिळण्याची शक्यता कमी? :

उद्धव ठाकरे गटाने शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या नावाचा पर्याय सुचविला आहे. मात्र शिंदे गटाकडूनही याच नावाची मागणी केली जाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे दोन्ही गटांनी एकाच नावाची मागणी केल्यास ते कोणालाही न मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता अधिक आहे.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मुक्त चिन्हांची यादी आहे. यात जवळपास १९७ चिन्ह आहेत. त्यातून तीन पर्याय सूचवता येतात. त्याचबरोबर या यादीत नसलेलं आणि कोणत्याही पक्षाला दिलं गेलेलं नसलेलं चिन्हही हे गट नियमांच्या अधिन राहून सूचवू शकतात.

    follow whatsapp