सोलापूर: ओवेसी ‘त्या’ कारमधून आले, वाहतूक पोलिसांनी ठोठावला 200 रुपयांचा दंड; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 09:02 AM • 23 Nov 2021

विजयकुमार बाबर, सोलापूर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (AIMIM Chief Asaduddin Owaisi)हे मंगळवारी (23 नोव्हेंबर) सोलापूर दौऱ्यावर आले होते. जिथे त्यांच्याकडून सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी 200 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. सोलापूरमध्ये लवकरच महापालिका निवडणुका पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (23 नोव्हेंबर) MIM पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला […]

Mumbaitak
follow google news

विजयकुमार बाबर, सोलापूर

हे वाचलं का?

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (AIMIM Chief Asaduddin Owaisi)हे मंगळवारी (23 नोव्हेंबर) सोलापूर दौऱ्यावर आले होते. जिथे त्यांच्याकडून सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी 200 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

सोलापूरमध्ये लवकरच महापालिका निवडणुका पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (23 नोव्हेंबर) MIM पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी ओवेसी हे स्वत: सोलापूरमध्ये आले होते. पण यावेळी ते नंबर प्लेट नसलेल्या कारमधून आले आणि हीच गोष्ट जेव्हा वाहतूक पोलिसांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी ओवेसींच्या ड्रायव्हरकडून 200 रुपयांचा दंड वसूल केला.

सोलापूर येथे आल्यानंतर ओवेसी हे शासकीय विश्रामगृहात उतरले होते. जिथे पोहतचात शहर पोलिसांनी त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नसल्याने दंडात्मक कारवाई केली. सेंट्रल मोटार व्हेकल रुल 50/177 नुसार कारवाई करत त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

असदुद्दीन ओवेसी (AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते नंबर प्लेट नसलेल्या वाहनात दिसत आहेत. मात्र, यावेळी ओवेसी मास्क घालायला विसरले नाहीत आणि कारमधून उतरण्यापूर्वी मास्क घातलेले दिसत आहेत.

…म्हणून ओवेसी आले सोलापूर दौऱ्यावर

दरम्यान, राज्यात तापलेले राजकीय वातावरण तसेच बिघडलेला धार्मिक सलोखा याबाबत ओवेसी नेमकं काय बोलतात याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा सोलापूर दौरा किती महत्त्वाचा ठरतो हे पुढील काही दिवसात पाहायला मिळेल

सोलापूरमध्ये काही दिवसातच महापालिका निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एआयएमआयएम पक्षातील सात नगरसेवक हे तौफिक शेख यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी ओवेसींचा सोलापूर दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या तयारीत ओवेसी व्यस्त

महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला विविध महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवण्याचा विचार करत असून असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) निवडणुकीची तयारी करत आहेत.

गेल्या महिन्यात औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यात म्हटलं होतं की, पक्ष उमेदवार निवडीबाबत चर्चा करत आहे आणि आमची निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे.

Ind Vs Pak : भारताचे जवान शहीद होत आहेत, पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना कशासाठी? ओवेसींचा मोदींना सवाल

ओवेसींना मुंबईत रॅलीची परवानगी नाही

असदुद्दीन ओवेसी यांना कोरोना साथीच्या रोगामुळे मुंबईत रॅलीची परवानगी मिळालेली नाही. ओवेसी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे एका सभेला संबोधित करणार होते. पण अद्याप तरी त्यांना प्रशासनाकडून याबाबतची परवानगी मिळालेली नाही.

    follow whatsapp