दादर येथील सुविधा शोरूमचे मालक कल्पेश मारू यांचा विरार हद्दीतील शिरसाड येथे मृतदेह सापडला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गशेजारी असलेल्या एका वाडीत हा मृतदेह सापडला असून त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी हा मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ADVERTISEMENT
विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय
परिसरातील नागरिकांना तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता. शिवाय मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना सापडली नसल्याने ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास आता मांडवी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कल्पेश मारू हे बऱ्याच दिवसांपासून आजारपणाला कंटाळले होते. त्यामुळे आजारपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं असावं का याचाही पोलीस तपास करीत आहेत.
दोन दिवसानंतर मृतदेहाची ओळख पटली
मुंबई- अहमदाबाद मार्गावरील फाट्याजवळ एका वाडीत त्यांचा मृतदेह हा आढळून आला. आत्महत्येची घटना ही दोन दिवसांपूर्वीच घडली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात दोन दिवसानंतर मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह कल्पेश मारु यांचाच असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 46 वर्षीय कल्पेश हे सुविधा शोरुमचे संचालक होते. दादर मधील प्रसिद्ध व्यापारी आणि सुविधा स्टोअर चे मालक शांतीलाल मारू यांचा ते मुलगा होत. मारू कुटुंबीय हे शिवाजीपार्क दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांचं मृतदेह अशा बेवारस अवस्थेत सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
यापूर्वी आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न
कल्पेश मारू हे मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यापूर्वी देखील त्यांनी काही वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी देखील माहिती समोर येत आहे. एकवेळा जोगेश्वरी पोलीस हद्दीत त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना वाचवण्यात यश आले होते, अशी माहिती मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली आहे. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल.
ADVERTISEMENT










