शिक्षकाचं क्रौर्य : विद्यार्थ्याने दुसऱ्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिल्याने डोकं आपटून दात पाडले

राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिक्षकाने एका मुलावर बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जालौरची घटना ताजी असताना उदयपूरमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाला एका खाजगी शाळेतील शिक्षकाने बेदम मारहाण केली आणि त्याचे दोन दात पाडले आचरट. मुलाचा दोष इतका होता की त्याने दुसऱ्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षकाविरोधात पोलिसात गुन्हा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:21 PM • 19 Aug 2022

follow google news

राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिक्षकाने एका मुलावर बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जालौरची घटना ताजी असताना उदयपूरमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाला एका खाजगी शाळेतील शिक्षकाने बेदम मारहाण केली आणि त्याचे दोन दात पाडले आचरट. मुलाचा दोष इतका होता की त्याने दुसऱ्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

शिक्षकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयपूर शहरातील हिरणमागरी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका खाजगी शाळेत विद्यार्थ्याने दुसऱ्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असता, रागाच्या भरात शिक्षकाने विद्यार्थ्याचे डोके टेबलावर आपटले. ज्यामुळे विद्यार्थ्याचे समोरचे दोन दात तुटले. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अन्य विद्यार्थ्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिल्याने शिक्षकाने सम्यकचं डोकं आपटलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश नंदावत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा सम्यक नंदावत हा एका खाजगी शाळेत शिकत होता, तो गुरुवारी शाळेत शिकत असताना हिंदी शिक्षक कमलेश वैष्णव याने अन्य एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला. अन्य विद्यार्थ्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सम्यकने दिलं. ज्यामुळे शिक्षक संतापले.

त्यानंतर संतापलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्याचे डोके पकडून टेबलावर आपटले. त्यामुळे विद्यार्थ्याचे पुढचे दोन दात अर्धे तुटले. शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यावर उपचार केले नाहीत किंवा कुटुंबीयांना कळवले नाही. विद्यार्थ्याने घरी येऊन घरच्यांना सांगितल्यावर त्याची आई त्याला खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि तेथे त्याच्यावर उपचार केले.

त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली, त्यावरून पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आम्ही संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

जालोर येथे शिक्षकाच्या बेदम मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू

याआधी राजस्थानमधील जालोरमध्ये 9 वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूवरून गदारोळ झाला होता. छैल सिंग या शाळेतील शिक्षकाने मुलाला मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या मारहाणीमुळे त्याच्या कानाची नस फुटून त्याचा मृत्यू झाला. हे संपूर्ण प्रकरण जालोरच्या सुराणा गावातील आहे. ही घटना 20 जुलै रोजी घडली होती.

    follow whatsapp