जेव्हा भाई जगताप यांनी सहा वर्षांपूर्वी प्रसाद लाड यांना अवघ्या दोन मतांनी हरवलं होतं..

मुंबई तक

• 01:45 AM • 21 Jun 2022

भाजपचे पाचही उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत जिंकून आले आहेत. प्रसाद लाड आणि भाई जगताप या दोघांमध्ये खरी चुरस होती. अशात भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी आपली किमया साधत राज्यसभेच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. या निकालामुळे सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीची आठवण सगळ्यांना झाली आहे. भाई जगताप हे विजयी झाले आहेत काँग्रेसचे चंद्रकांत […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

भाजपचे पाचही उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत जिंकून आले आहेत. प्रसाद लाड आणि भाई जगताप या दोघांमध्ये खरी चुरस होती. अशात भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी आपली किमया साधत राज्यसभेच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. या निकालामुळे सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीची आठवण सगळ्यांना झाली आहे. भाई जगताप हे विजयी झाले आहेत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पडले आहेत. मात्र सहा वर्षांपूर्वी प्रसाद लाड यांना दोन मतांनी हरवलं होतं.

हे वाचलं का?

काय घडलं होतं सहा वर्षांपूर्वी

विधान परिषद निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांच्या बाजूने मतदान केलं होतं. भाजपची मतं मिळवण्यासाठी तेव्हा प्रसाद लाड यांनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांशी संपर्क साधला होता. यासोबत शिवसेनेने पाच नगरसेवकांची मतं लाड यांच्याकडे वळवली होती. प्रसाद लाड यांना त्या निवडणुकीत ५६ मतं मिळाली होती. तर त्यांना टक्कर देणाऱ्या भाई जगताप यांना ५८ मतं मिळाली होती. दोन जास्त मिळवून भाई जगताप जिंकले. मात्र त्यावेळी त्यांना भाजपने घाम फोडला होता. आता या निवडणुकीत दोघेही समोरासमोर होते. दोघेही निवडून आले आहेत. चंद्रकांत हंडोरे यांचा मात्र पराभव झाला आहे.

एवढंच नाही तर २०२१ मध्ये भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्या ट्विटर वॉरही रंगलं होतं. महागाई विरोधात मोर्चा काढणाऱ्या काँग्रेसचा मोर्चा होता. त्यावेळी बैलगाडीवरून भाई जगताप आणि इतर नेते खाली पडले होते. यानंतर गाढवांचा भार उचलण्यास बैलांचा नकार असं खोचक ट्विट भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलं होतं. तर माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी इतके उत्सुक असलेले सर्व भाजप नेते, जर ते देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी तितकेच उत्सुक अस्ते तर! आज देशाची स्थिती अशी झाली नसती…. असा टोला भाई जगताप यांनी लगावला होता.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे तरीही भाजपने १३४ मतं मिळवली आहेत. महाविकास आघाडीतल्या एकीला सुरूंग लावण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसला सुरुंग लावत फोडाफोडी करून दाखवली आहे. भाजपने नाराज आमदारांना जवळ करत मतं फोडली आहेत.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान झालं. एकूण २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केलं. नवाब मलिक, अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने मतदानाची संमती नाकारली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात होण्यापूर्वी काँग्रेसने भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणीला उशीर झाला. अशात आता भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. तसंच भाई जगतापही विजयी झाले आहेत पण चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.

    follow whatsapp