Abhijit Dipke Interview : शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या आंदोलनाला आता देशव्यापी स्वरूप देण्याचा निर्धार अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनानंतरही सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने देशभर आंदोलन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'नवरा कामावर गेल्यावर सासरा माझ्यासोबत...' सुनेनं गाठलं पोलीस स्टेशन; काय घडलं?
आईचा विरोध, पण आंदोलन सुरूच
पुण्यातील आंदोलनासाठी रवाना होताना आईने “आता हे सगळं थांबव” अशी विनंती केल्याचे दीपके यांनी सांगितले. मात्र हा लढा आता वैयक्तिक राहिलेला नसून हजारो-लाखो तरुणांचा झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी मागे सरकलो तर तरुणांचा विश्वासच उरणार नाही,” असे ते म्हणाले.
राजीनाम्याची मागणी का?
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना दीपके म्हणाले की, कोणतीही चूक झाली असेल तर तिची जबाबदारी स्वीकारणे ही सुधारण्याची पहिली पायरी असते. “विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे हे मान्य केल्याशिवाय व्यवस्था सुधारू शकत नाही,” असे त्यांनी सांगितले.
‘जंतर-मंतरने दाखवून दिले की तरुण रस्त्यावर उतरतात’
सोशल मीडियावरील पाठिंब्याबरोबरच प्रत्यक्ष मैदानात किती लोक उतरतील, या प्रश्नावर दीपके यांनी जंतर-मंतर आंदोलनाचे उदाहरण दिले. “लोक फक्त ऑनलाइन राहतील असे म्हटले जात होते; पण हजारो तरुण प्रत्यक्ष आले. पुण्यातील आंदोलन त्याहून मोठे होईल,” असा दावा त्यांनी केला.
‘आम्ही अजून शिकत आहोत’
दिल्लीतील आंदोलनात व्यवस्थापन आणि नियोजनाचा अभाव असल्याच्या टीकेवर दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. “ही चळवळ पूर्णपणे ऑर्गॅनिक होती. आम्हाला आंदोलनाचा पूर्वानुभव नाही. अवघ्या १५ दिवसांत आम्ही लोकांना रस्त्यावर आणले. आता आम्ही संघटन आणि व्यवस्थापनही शिकत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांसाठी प्रेरणास्थान
आंबेडकरांच्या पुस्तकांसह दिसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर दीपके म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीपुरते मर्यादित नसून महिला, कामगार आणि सर्व वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढणारे नेते होते. “आंबेडकर हे प्रत्येक शोषित व्यक्तीचे प्रेरणास्थान आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
‘राजकीय संवाद वाढला पाहिजे’
सध्याच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात असहिष्णुता वाढल्याची खंत व्यक्त करताना दीपके म्हणाले की, विविध विचारसरणीच्या लोकांमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. “जोपर्यंत संवाद होत नाही, तोपर्यंत एकमेकांच्या समस्या आणि अपेक्षा समजू शकत नाहीत,” असे ते म्हणाले.
‘आजची तरुण पिढी जागरूक आणि अभ्यासू आहे’
आजच्या तरुणांबाबत अनेक गैरसमज असल्याचे सांगत दीपके म्हणाले, “ही पिढी अत्यंत जागरूक, अभ्यासू आणि स्पष्टपणे विचार मांडणारी आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणे म्हणजे त्यांना गंभीर विषय समजत नाहीत, असे नाही.”
राजकीय पक्षांनी तरुणांच्या अपेक्षा समजून घ्याव्यात
काही राजकीय पक्षांकडून उघड पाठिंबा न मिळाल्याच्या प्रश्नावर त्यांनी थेट प्रतिक्रिया टाळली. मात्र, “दोन कोटी लोक या चळवळीशी जोडले गेले आहेत. हा सर्व राजकीय पक्षांसाठी मोठा संदेश आहे. तरुणांच्या अपेक्षा, चिंता आणि स्वप्ने समजून घेण्यात राजकीय व्यवस्था कमी पडत आहे,” असे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा : '370 रुपयांची बिर्याणी'.. अन् प्रणित मोरेचा तर बाजारच उठला!
‘हा संघर्ष शांततामय मार्गानेच’
संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या चौकटीत राहूनच आंदोलन पुढे नेले जाईल, असे दीपके यांनी स्पष्ट केले. “हा लढा शांततेचा आहे. तरुणांचा आवाज ऐकला जावा आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, हीच आमची भूमिका आहे,” असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT











