Ambadas Danve tweeted video, नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उशिरा रात्री एक “कॅश बॉम्ब” टाकत शिंदे गटाला धारेवर धरलंय. दानवे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी नोटांचे बंडल रचताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओमुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.
ADVERTISEMENT
“शेतकऱ्यांसाठी पैसा नाही, पण इथे नोटांचे ढीग?” — दानवे
एक्सवर व्हिडिओ शेअर करताना दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “या सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी निधी नाही, पण इथे मात्र नोटांचे बंडल दिसत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी यांनी स्पष्ट करावे की हे आमदार कोण आणि या पैशांचा उपयोग कशासाठी केला जात आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : 'जिन्नांच्या दबावाखाली काँग्रेसची शरणागती', वंदे मातरम गीतावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य
“मी अधिकृत तक्रार करणार” — दानवे यांची भूमिका
अंबादास दानवे म्हणाले, “व्हिडिओमध्ये सत्ताधारी पक्षातील काही लोक स्पष्ट दिसत आहेत. इतकी मोठी रक्कम कुठून व कशासाठी आणली? याचा तपास झाला पाहिजे. पोलिसांनी यामागचे सत्य शोधावे. मी याबाबत तक्रार दाखल करणार आहे. कोणाचे नाव घेण्याचा हेतू नाही, पण चौकशी आवश्यक आहे.”
महेंद्र दळवींचं दानवेंच्या आरोपांना प्रत्युत्तर
महेंद्र दळवी म्हणाले, अंबादास दानवेंनी तो फोटो नीट पाहावा, व्यवस्थित ट्वीट करावा. लाल टी शर्टवाला व्यक्ती कोण आहे? हे उभा महाराष्ट्र बघेल. त्या व्हिडीओमध्ये मी असेन तर आमदारकीचा राजीनामा देईन. कोणाला तर ब्लॅकमेल करणे, हे अंबादास दानवेंचा धंदा आहे. त्यांच्याकडे कोणतं पद नाही. त्यांना कोणी विचारत नाहीये. कोणाला तरी बदनामी करणे हा त्यांचा धंदा आहे. मला बदनामी त्यांना सुपारी कोणी दिली हे त्यांनी सांगावं.
दानवेंनी व्हिडीओ शेअर केल्यानंतर शिंदे गटातून पहिली प्रतिक्रिया
यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, “हा व्हिडिओ आम्ही पूर्ण पाहिलेला नाही. कोणता आमदार आहे आणि किती बंडल आहेत हे माहित नाही. अंबादास दानवे काही खास शोधमोहीम चालवत आहेत का? आम्ही सत्तेत आहोत—म्हणून तीन पक्षांपैकी कोणत्या आमदाराचा हा व्हिडिओ आहे ते स्पष्ट व्हायला हवे. पैशांचा स्रोत आणि उद्देश तपासणे गरजेचे आहे. “दानवे यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही. त्यामुळे कदाचित ते अशा मोहिमा राबवत असतील.”, असा टोलाही गोगावले यांनी लगावला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











