anna hazare reaction on sonam wangchuk hunger strike : दिल्ली पोलिसांनी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारला या विषयावर संवाद साधण्याचा सल्ला दिला असून, वांगचुक यांनी तब्बल 20 दिवस उपोषण केले असल्याने त्यांच्या संयमाची परीक्षा घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात किंवा नाकाराव्यात हा वेगळा मुद्दा असला, तरी त्यांच्याशी चर्चा होणे अत्यावश्यक असल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाचा जामीन रद्द, हायकोर्टाचा रमेश म्हात्रेंना दणका
उपोषणकर्त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेणे योग्य नाही - आण्णा हजारे
जंतर-मंतरवरून सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारने या प्रकरणातील मौन सोडावे, असेही सांगितले. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर केवळ संवादातूनच मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. सरकारने स्वतःची भूमिका मांडावी आणि समोरच्या बाजूचेदेखील म्हणणे ऐकून घ्यावे. त्यानंतरच तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 20 दिवस उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेणे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : अभिजीत दीपके यांच्यावर महिलेकडून शाईफेक, पोलिसांनी घेतलं ताब्यात, VIDEO
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली
सोनम वांगचुक आपल्या विविध मागण्यांसाठी जंतर-मंतर येथे उपोषण करत होते. त्यांच्या उपोषणाला 20 दिवस पूर्ण झाले होते. दीर्घकाळ अन्न न घेतल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ अन्न न घेतल्यामुळे त्यांच्या शरीरात अशक्तपणा आला असून, पाण्याची कमतरताही आढळून आली आहे. मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ते पूर्णपणे शुद्धीवर होते. त्यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी नॉर्मल होती. सध्या वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, उपचारासाठी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या आंदोलनामागील प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी होती. आंदोलनाशी संबंधित संघटनांनी आरोप केला आहे की, NEETसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची राजकीय जबाबदारी निश्चित केली जावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)च्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी, पेपरफुटीच्या घटनांची पारदर्शक चौकशी आणि संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT












