sonam wangchuk : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलवले. यानंतर आंदोलनस्थळावरील आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश जारी करत दिल्ली पोलिसांनी आपल्याला मारहाण करून ताब्यात ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, "दिल्ली पोलिसांनी सोनम सरांना उचलून नेले. येथे आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. मी मित्राच्या घरी गेल्यानंतर पोलिसांनी मला मारहाण करून अडवून ठेवले. आता आम्हाला जंतर-मंतरला जाऊ दिले जात नाही." तसेच त्यांनी देशभरातील नागरिकांना आपल्या-आपल्या भागात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : समजून घ्या: डीलिमिटेशनमध्ये मतदारसंघ असे काही बदलले की काँग्रेसचा विश्वासच राहिला नाही?
दिल्ली पोलिसांनी X वरुन मांडली भूमिका
या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना काही आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ किरकोळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी संयम राखत संपूर्ण प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडली. तसेच जंतर-मंतरवरील आंदोलकांनी शांततेने आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आवाहनही करण्यात आले.
हेही वाचा : "डर्टी संजय राऊत, संघभूमीवर नाक रगडून..", नितेश राणेंनी थेट पत्र लिहिलं, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम
सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून जंतर-मंतर येथे उपोषण करत आहेत. नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या घटनांप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी 28 जूनपासून हे उपोषण सुरू केले आहे. प्रकृती सातत्याने खालावत असतानाही शुक्रवारी रात्री त्यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे आपले शरीराचे सुमारे 20 टक्के वजन कमी झाल्याचे सांगितले होते. शरीरातील स्नायूंवरही परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र मानसिकदृष्ट्या आपण अजूनही ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
आपल्या व्हिडीओ संदेशात सोनम वांगचुक यांनी 20 जुलै रोजी प्रस्तावित 'चलो संसद' मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. कांद्याच्या किमतींसारख्या मुद्द्यांवर सरकारची जबाबदारी निश्चित होऊ शकते, तर कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित कथित परीक्षा अनियमिततेवरही सरकारने उत्तर द्यावे, असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी NEET वादानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत सरकारने याबाबत उत्तरदायित्व स्वीकारावे, अशी मागणी केली. आंदोलनाशी संबंधित संघटनांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) च्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी, पेपरफुटीच्या प्रकरणांची पारदर्शक तपासणी आणि परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणांची मागणी केली आहे. ही प्राथमिक माहिती असून पुढील अपडेट्सची प्रतीक्षा आहे.
रोहित पवारांची फेसबुक पोस्ट
रोहित पवार म्हणाले, एक निस्पृह व्यक्ती आपल्या ध्येयापासून हटत नसल्याचं दिसताच घाबरलेल्या केंद्र सरकारने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हलवून रुग्णालयात दाखल केलं. यातून केंद्र सरकारला नेमका काय संदेश द्यायचाय? आम्ही आंदोलन मोडून काढू, पण आंदोलकांची मागणी मान्य करणार नाही, हाच तो संदेश आहे ना? अशी जबरदस्ती करण्यापेक्षा सरकार निष्क्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही? सरकारचा हा अहंकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे!
ADVERTISEMENT












