मोठी बातमी : सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं, उपोषणामुळे प्रकृती खालावली

मुंबई तक

18 Jul 2026 (अपडेटेड: 18 Jul 2026, 08:15 AM)

sonam wangchuk : जंतर-मंतरवरील उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलवले. NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची आंदोलकांची मागणी आहे.

sonam wangchuk

sonam wangchuk

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी : सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं

point

उपोषणामुळे प्रकृती खालावली

sonam Wangchuk : जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलवले. पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळावरील आंदोलकांनाही हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. NEETसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक यांनी 28 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.

हे वाचलं का?

हेही वाचा : टेकडीवरील वळणावर मुद्दाम बॅग पाडली, बालपणीच्या मित्राच्या मदतीने मुलीसमोर नवऱ्याची हत्या

सोनम वांगचुक यांचे 20 टक्के वजन कमी झाले? 

सलग सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याचे समोर आले होते. शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात वांगचुक यांनी आपल्या शरीराचे सुमारे 20 टक्के वजन कमी झाल्याचे सांगितले. तसेच शरीरातील स्नायूंवरही त्याचा परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, शारीरिक स्थिती खालावली असली तरी मानसिकदृष्ट्या आपण अजूनही खंबीर असल्याचा दावा त्यांनी या संदेशात केला.

हेही वाचा : "डर्टी संजय राऊत, संघभूमीवर नाक रगडून..", नितेश राणेंनी थेट पत्र लिहिलं, नेमकं काय घडलं?

'चलो संसद' मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

याच व्हिडिओद्वारे वांगचुक यांनी 20 जुलै रोजी प्रस्तावित 'चलो संसद' मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. कांद्याच्या दरवाढीसारख्या मुद्द्यांवर सरकारकडून जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते, तर देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततांबाबतही सरकारने उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच NEET वादानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

सोनम वांगचुक आणि त्यांच्या आंदोलनाशी संबंधित संघटनांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी केली आहे. NEETसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून यासाठी राजकीय जबाबदारी निश्चित केली जावी, असा आंदोलकांचा आरोप आहे. याशिवाय राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)च्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी, पेपरफुटी प्रकरणांची पारदर्शक तपासणी आणि परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणातील ही प्राथमिक माहिती असून पुढील अद्यतनांची प्रतीक्षा आहे.