मुंबई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि 'कॅप्टन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला बलात्कार व लैंगिक शोषण प्रकरणात अटक झाली आहे. याच अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकरांचे काही फोटो समोर आल्याने खळबळ माजली आहे. अशोक खरात याच्या चौकशीदरम्यान कोणताही राजकीय दबाव येऊ नये यासाठी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यामुळेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकरांना पदावरून तातडीने पायउतार होण्यास सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
नाशिकमध्ये बनावट 'आध्यात्मिक गुरू' अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, वाढता दबाव आणि जनक्षोभामुळे ही घडामोड घडत आहे. या प्रकरणामध्ये चाकणकर आणि ती वादग्रस्त व्यक्ती यांच्यात कथित संबंध असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संक्षिप्त चर्चेनंतर, या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदावरून तातडीने पायउतार व्हावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
नाशिक क्राइम ब्रांचने अशोक खरात याला अटक केली असून, त्याच्या कार्यालयातून 58 आक्षेपार्ह व्हिडीओ असलेला पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. हे व्हिडीओ महिलांना गुंगी येणाऱ्या औषध देऊन संमोहित करून तयार केले गेले असून, ब्लॅकमेलिंगसाठी वापरले गेले असल्याचा संशय आहे. प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आली असून, IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
हे ही वाचा>> बोटावर भलंमोठं ड्रेसिंग अन् नंतर बँडेज.., रुपाली चाकणकरांचे 4 फोटो पाहाच; सुषमा अंधारेंचे सनसनाटी दावे
या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्याशी निकट संबंध असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात चाकणकर यांनी खरात याच्या पायाची पूजा (पाद्यपूजन) करताना, त्यांच्यावर छत्री धरताना आणि विविध कार्यक्रमात एकत्र दिसणारे फोटो आहेत. खरात याच्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टमध्ये चाकणकर या विश्वस्त आहेत. विरोधकांनी हे प्रकरण "महाराष्ट्राचे एपस्टिन फाइल" म्हणून संबोधले असून, चाकणकर यांनी खरात यांना राजकीय संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे.
चाकणकर यांचे स्पष्टीकरण
रूपाली चाकणकर यांनी एक्सवर याबाबत एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, 'खरात यांच्याशी फक्त सामाजिक कार्यासाठी संबंध होता. संस्थेच्या ट्रस्टमध्ये सामाजिक कामासाठी सहभाग होता, पण खरात यांच्या कथित गुन्ह्यांची माहिती नव्हती. तपास निष्पक्षपणे होईल यावर विश्वास आहे.'
हे ही वाचा>> 'रुपाली चाकणकरांना अटक करुन नार्को टेस्ट करा' सुषमा अंधारेंची मागणी; एकनाथ शिंदेंविषयी काय म्हणाल्या?
सामाजिक प्रतिक्रिया
सोशल मीडियावर "महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वतः भोंदू बाबाच्या पायाला पाणी घालतात, मग महिलांच्या सुरक्षेची हमी कशी?" अशा टीका विरोधकांकडून होत आहेत. हे प्रकरण अंधश्रद्धा, राजकीय नेत्यांचे भोंदू बाबांशी संबंध आणि महिलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी असलेल्या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत आहे.
प्रकरणाची चौकशी सुरू असून, अधिक महिलांच्या तक्रारी समोर येण्याची शक्यता आहे. राजीनामा झाल्यास हे महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांसाठी एक मोठे पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT











