Baramati Vidhansabha By Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी सहानुभूतीची लाट होती. यामुळेच त्यांनी तब्बल 2,18,930 इतकी विक्रमी मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत चर्चेत असलेले अनेक चेहरे रिंगणात असताना सुनेत्रा पवार यांच्या मताधिक्यापुढे इतर सर्व उमेदवारांचा निभाव लागला नाही. बारामतीच्या मतदारांनी सुनेत्रा पवार यांच्यावर दाखवलेला हा विश्वास त्यांना देशात विक्रमी मतांनी निवडून आणणारा ठरला आहे.
ADVERTISEMENT
अपक्ष उमेदवारांची मतांसाठी धडपड
या पोटनिवडणुकीत नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र मतदारांनी त्यांना पूर्णपणे नाकारल्याचे दिसून येत आहे. अपक्ष उमेदवार म्हणून नशीब अजमावणारे अभिजीत बिचुकले यांना केवळ 332 मते मिळवता आली, तर करुणा मुंडे यांच्या पारड्यात केवळ 300 मते पडली. या दोन्ही उमेदवारांना मिळालेली मते पाहता, बारामतीच्या राजकारणात असो अथवा कुठल्याही मतदारसंघात असो... केवळ सोशल मीडियावर चर्चेत राहून मते मिळवता येत नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारांना मिळालेली एकूण मते....
1) सुनेत्रा पवार यांना मिळालेली एकूण मते 2,18,930
2) अभिजीत बिचकुले अपक्ष उमेदवार यांना मिळालेली एकूण मते 332
3) करुणा मुंडे यांना मिळालेली एकूण मते 300
4) आर वाय घुटुकडे यांना मिळालेली एकूण मते 931
5) चंद्रकांत मोटे यांना मिळालेली एकूण मते 403
6) विराज शिंदे यांना एकूण मिळालेली मते 533
7) नोटा 773
दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस, सूनेत्रा पवारांनंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण?
सुनेत्रा पवार यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते नेमकी कोणाला मिळाली, या प्रश्नाचे उत्तर आर. वाय. घुटुकडे यांच्या रूपाने समोर आले आहे. घुटुकडे यांनी 931 मते मिळवून या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे, जे इतर सर्व अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत जास्त आहे. इतर उमेदवारांचा विचार केला तर विराज शिंदे यांना 533 मते मिळाली, तर चंद्रकांत मोटे यांच्या पदरी केवळ 403 मते पडली. आश्चर्याची बाब म्हणजे, या निवडणुकीत 773 मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला असून ही संख्या बिचुकले, मुंडे आणि मोटे यांसारख्या वैयक्तिक उमेदवारांपेक्षाही अधिक आहे.
बारामतीचा कौल स्पष्ट; पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचे निर्विवाद वर्चस्व
एकूणच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा हा निकाल पाहता मतदारांनी कोणत्याही गोंधळाशिवाय स्पष्ट कौल दिल्याचे दिसत आहे. सुनेत्रा पवार यांनी मिळवलेली 2,18,930 मते ही त्यांच्या कामाची पावती मानली जात आहे, तर दुसरीकडे आर. वाय. घुटुकडे यांनी मिळवलेली 931 मते त्यांना दुसऱ्या क्रमांकावर घेऊन गेली आहेत. निवडणुकीच्या मैदानात गाजावाजा करणाऱ्या उमेदवारांपेक्षा शांतपणे निवडणूक लढवणाऱ्या घुटुकडे यांनी जास्त मते मिळवून सर्वांना चकित केले आहे. या निकालाने बारामतीमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा अधोरेखित केली असून सामान्य मतदारांनी दादांच्या पश्चात त्यांच्या पत्नीवर आपला विश्वास कायम ठेवला असल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बोगस PSI बनून महिला कॉन्स्टेबलला ओढले जाळ्यात, आक्षेपार्ह फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग अन् शेवटी...
ADVERTISEMENT











