रोहिदास हातागळे/बीड : बीड येथील जीएसटी विभागात कार्यरत एका अधिकार्याचा मृतदेह सोलापूर-धुळे महामार्गालगत कपीलधार रोडवर शनिवारी दुपारी एका कारमध्ये आढळला. या अधिकार्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शवविच्छेदन अहवालामध्ये समोर येणार असले तरी त्यांच्या खिशामध्ये सुसाईड नोट आढळली असून त्यामध्ये वरिष्ठांचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. यातील एका अधिकार्याला बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
सचिन जाधवर (35, रा.चुंब, ता.बार्शी, जि.सोलापूर) असे मृतदेह आढळलेल्या अधिकार्याचे नाव आहे. सचिन जाधवर हे बीड येथील जीएसटी विभागात कार्यरत होते. शुक्रवारी ते ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडले ते रात्री उशीरापर्यंत घरी पोहचले नव्हते. मित्र व नातेवाईकांनी शोधाशोध केली तसेच पोलिसात तक्रार देखील देण्यात आली. या दरम्यान सोलापूर-धुळे महामार्गालगत कपीलधार रोडवर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. या ठिकाणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि बाळराजे दराडे यांच्यासह कर्मचार्यांनी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर जाधवर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. जाधवर यांच्या खिशामध्ये सुसाईड नोट आढळली असून यामध्ये बीड येथीलच जीएसटी विभागात कार्यरत वरिष्ठ अधिकार्याचे नाव आहे. त्या अधिकार्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.
सचिन जाधवर यांनी पुस्तकेही लिहिली
बीड येथील जीएसटी ऑफिस मध्ये राज्य कर अधिकारी असलेले सचिन जाधवर हे मूळचे चुंब ( ता.बार्शी, जि. सोलापूर ) येथील रहिवासी आहेत. जाधवर हे बीएससी ऍग्री बायोटेक आणि एम ए इंग्लिश होते. सन 2012 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्यांची एसटीआय पदी नियुक्ती झाली होती. युट्युबच्या चॅनलच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केलेले आहे. विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांवर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. सचिन जाधवर यांनी त्या अनुषंगाने पुस्तके देखील लिहिलेली आहेत.
गाडीमध्ये आढळले कोळसा अन् गाडगे
जाधवर यांची कार ही वर्दळ नसलेल्या रस्त्यावर थांबवलेली आढळली. त्यांची गाडी आतून लॉक करण्यात आलेली होती. या गाडीमध्ये एक मडके व त्यामध्ये कोळसा देखील आढळला आहे. मडक्यामध्ये कोळसा देखील पेटवण्यात आला होता. त्याचा धूर झाल्याने गुदमरुन जाधवर यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
वरिष्ठांकडे केली होती तक्रार
जाधवर यांना गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधीत वरिष्ठ अधिकार्याकडून त्रास दिला जात होता. त्याबाबत त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार देखील केली होती, त्याची दखल जर वेळीच घेतली गेली असती तर जाधवर यांच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. दरम्यान, बीडमधील कार्यरत या अधिकार्याची बदली जालना येथे झाली होती, तरी देखील तो बीडमध्येच कार्यरत होता, बदली झालेली असतांनाही तो कसा काय बीडमध्ये कार्यरत राहू शकत होता, असा सवाल आता नातेवाईकांनी केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











