मुंबईः लहानपणी तुम्ही टोपीवाल्याची गोष्ट ऐकली असेल. एक टोपीवाला असतो, तो टोप्यांची विक्री करत एका गावावरून दुसऱ्या गावाला जात असतो. मध्ये जंगल लागते. मग दुपारच्या विश्रांतीसाठी तो तिथे थांबतो. जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं अंग टाकतो, वामकुक्षीसाठी. तेवढ्यात एक माकड झाडावरून येते आणि टोप्यांची पेटी उघडून एक टोपी डोक्यावर घालते आणि परत झाडावर जाऊन बसते. आता एका माकडाची ती कृती बघितल्यानंतर सगळी माकडे त्याचं अनुकरण करतात. त्या पेटीतील टोप्या घेतात, डोक्यावर घालतात आणि झाडावर जाऊन बसतात.
ADVERTISEMENT
थोड्या वेळाने व्यापाऱ्याला जाग येते. जाग आल्यावर बघतो तर काय, पेटीतल्या सगळ्या टोप्या गायब! वरती बघतो तर सगळे टोपीवाले! आता यांच्याकडून टोप्या काढून कशा घ्यायच्या हा त्याच्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न असतो. त्याच वेळेला तो त्यांना दगड मारून बघतो, त्यांची विनवणी करून बघतो, पण काही हाती लागत नाही. अखेर तो स्वतः, स्वतःची टोपी घालतो आणि ती टोपी काढून पेटीत फेकतो.
त्याची ही कृती बघितल्या बघितल्या सगळी माकडे पटापटा आपल्या डोक्यावरच्या टोप्या घेतात आणि पेटीत आणून टाकतात. मुद्दा काय आहे? मुद्दा आहे युक्तीचा. आता युक्ती ज्यावेळेला स्थितीत बदलते, त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीची परिस्थिती आपल्यासमोर येते. तुम्ही म्हणाल की नेमका या विषयाचा आणि आजचा संबंध काय आहे? तर ते समजून घेण्यासाठी याची Inside स्टोरी नक्की वाचा.
NCP ची खरी सूत्रं कोणाच्या हातात?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार या पक्षाचे, अजित दादा एकहाती सेनापती होते. ते रिंग मास्टर होते. ते हयात असताना त्यांच्यासमोर तोंड उघडण्याची हिंमत भल्याभल्यांची व्हायची. पण त्यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस कोण चालवतंय हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि म्हणून टोपीवाल्याची आठवण आली.
त्याचं कारण असं आहे की राज्यसभेची उमेदवारी असो, विधान परिषदेची उमेदवारी असो किंवा पक्षातल्या नेत्यांच्या कुरघोडी असो, या सगळ्या शमवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला यश येताना दिसत नाहीये. अर्थात ते नेतृत्व कागदोपत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. त्या उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत.
आता मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस कोण चालवतंय हा प्रश्न का पडावा? तर त्याचं कारण आहेत छगन भुजबळ. छगन भुजबळ यांची इच्छा होती राज्यसभेवरती जाण्याची. त्यासाठी त्यांनी पक्षाकडे आपली इच्छा बोलून पण दाखवली. पण त्यासाठी छगन भुजबळांनी एक अट टाकली. ती अट अशी होती की माझा पुतण्या समीर भुजबळ याला तुम्ही मंत्रीपदी शपथ द्या. त्याला शपथ दिली की मी आमदारकीचा राजीनामा देतो आणि राज्यसभेचा फॉर्म भरतो. अर्थात ही इच्छा त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे पण बोलून दाखवली.
पक्षातल्या जेष्ठांचा, म्हणजे त्यांच्या समवयस्कांचा त्याला विरोध होता. देवेंद्र फडणवीसांनी श्रेष्ठींकडे बोट दाखवलं. अखेर भुजबळ प्रचंड नाराज झाले. जर पक्षामध्ये प्रफुल पटेल यांच्या निकटवर्तीयांची वर्णी लागू शकते, जर पक्षामध्ये सुनील तटकरे यांची कन्या मंत्री होऊ शकते आणि मुलगा विधान परिषदेचा उमेदवार आणि आमदार होऊ शकतो, तर मग तोच न्याय मला का लागू नये असा साधा सवाल छगन भुजबळांनी विचारलेला होता.
अर्थात छगन भुजबळांना तो त्यांचा हक्क वाटत होता. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. छगन भुजबळ खाजगीमध्ये बोलताना एका ठिकाणी असेही म्हणाले की पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये प्रचंड कष्ट घेतले, पण आम्ही पण थोडंफार योगदान दिलं असेलच ना! आता भुजबळांची ही इच्छा जी आहे ती लपून राहिलेली नव्हती. या आधी सुद्धा भुजबळांना जेव्हा राज्यसभेवरती जायचं होतं, त्यावेळेला दोन वेळा अजित पवारांनी त्यांना ती संधी नाकारलेली होती. एका वेळी सुनेत्रा पवार स्वतः राज्यसभेच्या उमेदवार म्हणून दिल्लीमध्ये गेल्या, त्यानंतर आपण बघितलं की नितीन काका पाटील यांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलं. दोन्ही वेळेला भुजबळांची इच्छा होती. पण भुजबळांना आता आपल्यावरती सतत अन्याय होतोय अशी भावना जी आहे ती दृढ झालेली आहे.
अर्थात माध्यमांसमोर बोलताना छगन भुजबळ हे अशा पद्धतीची कुठलीही थेटपणे भावना व्यक्त करताना दिसत नाही, पण खाजगीमध्ये अशा पद्धतीची चर्चा होत असते. आता मुद्दा असा आहे की ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागेल याची खात्री होती, पण अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना दूर ठेवलेलं होतं.
त्याचं कारण होतं की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनांतर छगन भुजबळांनी घेतलेली भूमिका ही पक्षाच्या सोबत जाणारी होती की पक्षाच्या विरोधी जाणारी होती हा प्रश्न होता आणि म्हणून भुजबळ सर्वात जेष्ठ असताना सुद्धा त्यांना त्यापासून दूर ठेवण्यात आले. आता मुद्दा असा आहे की ज्या टोपीवाल्याची गोष्ट मी सांगितली, तीच इथं महत्त्वाची ठरते. छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, छगन भुजबळ यांचा अनुभव मोठा आहे. छगन भुजबळ नवी दिल्लीमध्ये गेले असते तर एक ओबीसीचा मोठा चेहरा नवी दिल्लीमध्ये गेला असता. पण असं असताना सुद्धा त्यांच्याऐवजी ज्यांची वर्णी लागलेली आहे, त्यांचा पक्षाला नेमका काय फायदा?
छगन भुजबळांच्या ऐवजी ज्या राजेंद्र जैन यांना पाठवण्यात आलं, ते राजेंद्र जैन हे एकेकाळी प्रफुल पटेल जे राष्ट्रवादीचे तगडे नेते आहेत, त्यांचे पीए म्हणून काम करायचे. १२ वर्ष ते विधान परिषदेवरती पण राहिले, पण राजेंद्र जैन यांनी केलेलं ठळक काम महाराष्ट्रातल्या कुठल्याही मोठ्या नेत्याला किंवा जनतेला आठवतंय का? हा जर प्रश्न आपण विचारला तर त्याचं उत्तर 'नाही' असं येईल. राजेंद्र जैन हे भंडारा बँकेचे अध्यक्ष आहेत. निश्चितपणे त्यांचा भंडारा जिल्ह्यामध्ये थोडाफार क्लाउड आहे. पण आपण असं बघतोय की २०१४ नंतर भंडारा गोंदियाची जागा प्रफुल पटेलांना स्वतःला जिंकता आलेली नाहीये. त्यामुळे राजेंद्र जैन यांना तिकीट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने काय साध्य केलं? जी काही अडीच-तीन वर्षाची राष्ट्रवादीची खासदारकी होती, त्या खासदारकीवरती जैन यांना पाठवून पक्षाला नेमका कुठला फायदा झाला?
मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्षावरच नियंत्रण मिळवून एका प्रकारे छगन भुजबळांना जी त्यांची स्वाभाविक इच्छा होती राज्यसभेवरती जाण्याची, त्या इच्छेपासून दूर ढकललं का? हा प्रश्न विचारला जातोय. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय पातळीवरती प्रफुल पटेल हे भाजपच्या नेत्यांच्या अत्यंत जवळ संपर्कात असल्याचं बोललं जातं आणि राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की सुनील तटकरे यांच्या संघटनेवरती मजबूत पकड आहे आणि म्हणून नेमकी टोपी कोणी खाली टाकली? तो जो युक्ती लढवणारा आहे, तो नेमका कोण आहे? कोणाच्या मनात आलं की छगन भुजबळ हे दिल्लीला गेले तर कोणाला अडचण होत होती? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
आता थोडं मागे जाऊया. थोडं मागे म्हणजे विक्रम काकडे यांची उमेदवारी. आता विक्रम काकडे हे खरंतर भाजपचे नेते संजय काकडे यांचे पुत्र. संजय काकडे हे मोठे उद्योगपती आहेत, शेकडो कोटींचा त्यांचा बिझनेस आहे. पण संजय काकडे हे सुरुवातीला जरी अजित दादांसोबत काम करत राहिले तरी गेल्या काही काळापासून ते भाजपमध्ये सक्रिय होते. २०१७ च्या आधी त्यांनी भाजपमध्ये थेटपणे प्रवेश केला आणि इतकंच नव्हे तर २०१७ ला ज्यावेळेला इथं महायुतीचं सरकार होतं, त्यावेळेला पुण्यामध्ये अजित दादांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचं काम संजय काकडे यांनीच केलं आणि त्याचमुळे भाजपची महापालिकेवरती सत्ता येण्यामध्ये मदत झाली.
आता त्या संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी पार्थ पवार आग्रही होते असं सांगितलं जातं. आता मुद्दा असा आहे की पार्थ पवार आणि विक्रम काकडे हे अत्यंत जवळचे मित्र असल्याची चर्चा आहे. अर्थात यामुळेच विक्रम काकडे यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी त्यांचा आग्रह होता, पण मुद्दा असा होता की ज्या संजय काकडे, ज्या विक्रम काकडेचे वडील संजय काकडे हे भाजपामध्ये आहेत आणि मग विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीतून कसं पाठवायचं हा प्रश्न निर्माण झाला आणि मग विक्रम काकडे आणि संजय काकडे यांनी थेट भाजप हाय कमांडची, म्हणजे महाराष्ट्रातल्या हाय कमांडची परमिशन घेऊन राष्ट्रवादीचा गमछा गळ्यात घातला आणि विक्रम काकडे यांची उमेदवारी जी आहे ती तिथे निर्विरोध झाली. एका पद्धतीने विक्रम काकडे यांच्यासाठी श्रीकांत पाटील हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे उमेदवार होते, शरद पवारांच्या पक्षाचे, त्यांना सुद्धा माघार घ्यावी लागली. सुनेत्रा पवारांनी त्यासाठी शरद पवारांना फोन केल्याचं सांगितलं जातं आणि आपण बघितलं की विक्रम काकडे हे विधान परिषदेवरती आता बिनविरोध निवडून गेलेले आहेत.
मुद्दा असा आहे की ही सुद्धा म्हणजे ही जी युक्ती आहे की विक्रम काकडे यांचे वडील संजय काकडे की जे भाजपचे अत्यंत निकटवर्ती आहेत. ते विक्रम काकडे विधान परिषदेवर जावे ही कोणाची इच्छा? ही जी टोपी खाली टाकलेली आहे ती नेमकी कोणी टाकली की ज्याला अख्खी राष्ट्रवादी जी आहे ती फॉलो करत राहिली? अख्ख्या राष्ट्रवादीतले लोक जे आहे ते त्या निर्णयासोबत राहिले. विक्रम काकडे यांचे राष्ट्रवादीसाठी नेमकं काय योगदान आहे? विक्रम काकडे हे फरडे वक्ते आहेत का? विक्रम काकडे यांना मोठं जनसमर्थन आहे का? विक्रम काकडे हे युवकांमध्ये लोकप्रिय आहेत का? विक्रम काकडे यांचा पक्ष वाढवण्यासाठी उद्याच्या काळामध्ये काही मोठा फायदा होऊ शकतो का? कल्पना! थोडं मागे येऊया.
झिशान सिद्दीकी! झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र. इलेक्शनच्या आधी आपल्याला कल्पना आहे की बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी हे अजित दादांच्या जवळचे मानले जायचे, पण दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला झिशान सिद्दीकी निवडणूक हारले, निवडणूक हारल्यानंतर त्यांना पक्षामध्ये ज्यावेळेला विधान परिषदेची संधी देण्याची वेळ आली, त्यावेळेला नेमकी कोणाच्या इशाऱ्याने टोपी खाली पडली?
त्याचं कारण असं आहे की पक्षामध्ये गेली अनेक वर्ष अजित दादांसोबत रक्ताचं पाणी करणारे अनेक चेहरे त्या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून वंचित राहिले. त्यांना इच्छा होती, त्यांना असं वाटत होतं की किमान ही संधी तरी आपल्याला मिळेल, पण तसं काही झालं नाही. झिशान सिद्दीकी यांचा बॉलिवूड मधला जो भाईचारा आहे, तो भाईचारा सुद्धा त्यासाठी कामी आल्याचं सांगितलं जातं. आता त्यामुळे झालं काय की एकाच पक्षामध्ये मुंबईमध्ये सना मलिक, नवाब मलिक, कप्तान मलिक ही सगळी मंडळी राष्ट्रवादीसाठी काम करत असताना इतके मुस्लिम चेहरे असताना आणखीन एक झिशान सिद्दीकी नावाचे युवा नेते जे आहेत ते विधान परिषदेवरती निवडून गेले.
आता गेल्या दीड-दोन वर्षांपूर्वीच काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या झिशान सिद्दीकी यांचं राष्ट्रवादी काँग्रेससाठीचं काय योगदान आहे? राष्ट्रवादी काँग्रेससाठी अजित दादांपासून शरद पवारांपर्यंत आणि अजित दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अनेकांनी रक्ताचं पाणी केलं, त्यांना ती संधी का मिळाली नाही? ती कोणाची इच्छा होती की झिशान सिद्दीकी विधान परिषदेवरती गेले? त्यासाठी नेमक्या कोणी ही टोपी जी आहे व्यापाऱ्याची ती खाली टाकायला लावली? ज्याचं अनुकरण अख्ख्या राष्ट्रवादीने केलं. कल्पना नाहीये.
मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय घेणारे लोक कोण आहेत? हा प्रश्न विचारण्याचं कारण हे आहे की गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार या पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आहेत, पण पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमधून सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्या ऐवजी इतर नावांचा समावेश करून जी लेटर्स पाठवण्यात आली, ती लेटर्स दिल्लीत पोहोचली आणि दिल्लीत पोहोचल्यानंतर "एक क्लेरिकल मिस्टेक आहे" असं सांगण्यात आलं की कोणाची इच्छा होती की अशा पद्धतीने सुनील तटकरे, प्रफुल पटेल ही जी मंडळी आहेत, या मंडळींची नाव जी आहेत ती या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये नसावीत किंवा पक्षाच्या निर्णय क्षमतेमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये नसावीत असं वाटावं? कल्पना नाहीये.
मुद्दा असा आहे की त्याआधी सुद्धा, त्याआधी सुद्धा जर आपण बघितलं तर अशाच पद्धतीचं एक पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर जो काही पत्रव्यवहार इलेक्शन कमिशनला झालेला आहे तो ग्राह्य धरू नये असं सांगण्यात आलेलं होतं, पण त्यामुळे मोठी अडचण झाली. त्याचं कारण असं आहे की त्याच कार्यकारणीने सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपदी नियुक्त करावं असा ठराव इथं वरळी डोमला मांडलेला होता. आणि त्यांनीच त्यांना पक्षाच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान करावं असंही म्हटलेलं होतं, त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाल्यामुळे तेही पत्र विड्रॉ केलं.
आता अजून थोडं मागे जाऊयात. अजित दादांच्या निधनानंतर त्यांचं निधन प्लेन क्रॅशमध्ये झालं आणि त्या कंपनीचे मालक के. सिंग, त्यांचा मुलगा रोहित सिंग आणि टीडीपीच्या नेत्यांचे काय संबंध आहेत याबद्दल अत्यंत अभ्यासपूर्ण पत्रकार परिषदा रोहित पवार यांनी घेतल्या आणि रोहित पवार यांनी या के. सिंग आणि त्यांच्या कंपनीने केलेल्या नियमांचं उल्लंघन चव्हाट्यावर आणलं. अजित दादांच्या मृत्यूबद्दल आज गावखेड्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली. खरं तर हे काम, हे प्रश्न पार्थ पवार, जय पवार किंवा सुनेत्रा वहिनी पवार यांनी विचारायला हवे होते, पण ते रोहित पवार यांनी विचारले.
आणि म्हणून प्रश्न असा आहे की रोहित पवार यांनी जे प्रश्न विचारले ते प्रश्न विचारण्याचे धाडस पार्थ पवार, सुनेत्रा पवार, जय पवार यांनी का केले? जर सुनेत्रा वहिनींना पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल संशय होता आणि त्यांनी असे काही निर्णय घेतले होते की ज्यामुळे पक्षाचा कंट्रोल पवार कुटुंबाकडून जाईल अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तर ते पत्र त्यांनी मागे का घेतलं? त्यासाठी सुद्धा कुणीतरी टोपी खाली टाकली होती का? त्यानंतर जेव्हा पक्षाच्या विलिनीकरणाचा प्रश्न आला तेव्हाही विलिनीकरण कुठलं, कुठल्या पक्षात? असा प्रश्न तटकरेंनी विचारलेला होता. अर्थात दोन्ही पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेले आहेत, पण तरी त्या विलिनीकरणाच्या मध्ये नेमका कुठला गाढ आला? त्यावेळेला नेमकी कोणी टोपी खाली टाकली? ज्याचं अनुकरण अख्ख्या राष्ट्रवादीने, प्रफुल पटेल, सुनील तटकरे सकट सगळ्या राष्ट्रवादीने केलं.
सुनेत्रा पवार ज्यावेळेला पक्षाच्या अध्यक्ष झाल्या आणि उपमुख्यमंत्री झाल्या, त्यानंतर पक्षामध्ये ज्या पद्धतीची शिस्त असायला हवी होती, त्या शिस्तीला गालबोट लावण्याचं काम वारंवार का बरं करण्यात आलं? त्यासाठी कुणाच्या इशाऱ्याने टोप्या खाली टाकण्यात आल्या? मुद्दा असा आहे की असं सांगितलं असं जातं की गेल्या काही काळापासून सगळे निर्णय जे आहे ते देवगिरीवरून होतात. अर्थात देवगिरी म्हणजे अजित दादा पवार यांचे निवासस्थान जे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान. आणि त्या देवगिरीवरती बसून निर्णय घेणारे हे पार्थ पवार आहेत.
आता मुद्दा असा आहे की ज्या ज्या निर्णय त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, त्या त्या निर्णयांना एका पद्धतीने त्याचा पतंग कापण्यात आला, तर तो जो पतंग त्यांच्या निर्णयांचा कापलेला आहे त्यासाठीच्या टोप्या खाली कोणी टाकल्या? नेमका महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीत काय व्हावं हे कोण ठरवतंय? छगन भुजबळ यांच्या निमित्ताने हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि हाही प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यकाळामध्ये कोणाच्या मागे उभा राहणार आणि कोणाच्या इशाऱ्यांना आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली टाकणार? बाकी जी युक्ती लढवून त्या टोपीवाल्या व्यापाऱ्यांना आपल्या सगळ्या टोप्या परत घेतल्या, तशाच पद्धतीने जो हरवलेला कंट्रोल आहे, तो परत घेण्यासाठी दुसरी कुठली युक्ती पक्षाच्या अध्यक्षांना मिळते का किंवा दुसरी कुठली युक्ती सापडते का? कल्पना नाहीये. पण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन-चार राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्याचा कंट्रोल हा कुठल्यातरी टोपीवाल्याकडे आहे, जो टोपीवाला त्यांच्या पक्षात निश्चितपणे नाही असं ठामपणे म्हणता येईल.
ADVERTISEMENT











