Dhananjay Munde court case, रोहिदास हातागळे/बीड : जगमित्र शुगर्स या प्रस्तावित कारखान्यासाठी जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या सह तिघांविरुद्ध फसवणूक केल्याच्या खटल्यात अंबाजोगाई न्यायालयाने धनंजय मुंडे व अन्य तिघांना दोषमुक्त केले होते. त्यावर अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला पुन्हा सुरू करण्याचा अर्ज केल्यानंतर न्यायालयाने तो खटला पुनरुज्जीवित करण्याच्या दिलेल्या निर्णयावर धनंजय मुंडे यांनी केलेल्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर स्थगिती दिली आहे.
ADVERTISEMENT
अपीलाची मुदत पूर्ण होईपर्यंत स्थगिती
न्यायालयात धनंजय मुंडे यांच्या वतीने त्यांचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी स्थगिती अर्ज दाखल केला होता. धनंजय मुंडे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल करेपर्यंत किंवा अपिलाची मुदत पूर्ण होई पर्यंत हा खटला चालविण्यास अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
२०११ -१२ साली खरेदी केलेल्या या जमिनीच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली, तत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी तपास करून तक्रारीत तथ्य न आढळल्याने गुन्हा दाखल केला नाही, त्यानंतर उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात दोन्ही पक्षांचे म्हणणे, साक्ष, पुरावे इत्यादी वस्तुस्थिती पाहून अंबाजोगाई न्यायालयाने धनंजय मुंडे व अन्य तिघांना दोषमुक्त केले होते. मात्र त्याविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलेल्या अर्जावर दोन्ही बाजूंचे म्हणणे न्यायालयाने ऐकल्यानंतर स्थगिती देण्यात आली असून, श्री मुंडे यांना अपील करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे.
मुंडेंचे वकील म्हणतात..
न्यायालयाचा स्थगिती निकाल स्वयंस्पष्ट असून तो न्यायालयाच्या पोर्टलवर देखील उपलब्ध आहे. मात्र याबाबत अर्धवट माहितीच्या आधारे कुणीतरी खोडसाळपणाने चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले असून, संबंधितास कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे मुंडे यांचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT











