dharashiv politics : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी शिवसैनिकांमध्ये तीव्र भावना व्यक्त होताना दिसल्या. 'मुंबई Tak' ने उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी सभा स्थळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी अनेक शिवसैनिकांनी आपण 1984 पासून शिवसेनेत कार्यरत असून आपली निष्ठा ही व्यक्तीशी नव्हे तर ठाकरे परिवाराशी असल्याचे सांगितले. ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी नव्हे तर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी आपण काम केले असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी ओमराजे यांच्या पक्षांतराला गद्दारी संबोधत त्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात विजांसह पाऊस घालणार धिंगाणा, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट
'ओमराजे निंबाळकर यांच्या विजयामागे सर्वसामान्य शिवसैनिकांचे योगदान'
संवादादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या विजयामागे सर्वसामान्य शिवसैनिकांचे योगदान असल्याचे सांगितले. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च केला, काहींनी आपल्या मुलांनी गल्ल्यातून काढलेले पैसेही प्रचारासाठी दिल्याचा उल्लेख केला. ओमराजे यांना मिळालेले साडेतीन लाख मतांचे मताधिक्य हे पैशामुळे नव्हे तर शिवसैनिकांच्या निष्ठेमुळे मिळाले असल्याचा दावा करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून खर्च झालेल्या पैशांचा उल्लेख करत आता त्या विश्वासाला तडा गेल्याची भावना व्यक्त केली.
हेही वाचा : डमी पुतळा, सियाला लोहगडावर आणलं, पोलिसांना काय तपासलं?
'उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य'
उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे अनेकांनी सांगितले. ठाकरे यांनी उमेदवार म्हणून कोणालाही संधी दिली तरी त्याला निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. ओमराजे निंबाळकर यांच्या जाण्याने पक्षाला कोणताही मोठा फटका बसणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत सामान्य शिवसैनिक अजूनही ठामपणे ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात आले. तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्षनिष्ठेच्या जोरावर लढण्याची तयारी असल्याचेही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
संवादात काही कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकर यांनी खासदारपदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जाण्याचे आव्हान दिले. त्यांच्या पक्षांतरामुळे धाराशिवमधील राजकीय समीकरण बदलले असले तरी ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांचा उत्साह कायम असल्याचा दावा करण्यात आला. यापुढे धाराशिवमध्ये ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, तसेच आगामी काळात पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर राजकीय लढत दिली जाईल, अशी भूमिका संवादात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी मांडली.
ADVERTISEMENT











