“...तर सेवेचा राजीनामा द्या आणि”, राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना सुनावलं

Raj Thackeray on Vishwas Nangare Patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विश्वास नांगरे पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे या वादाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Raj Thackeray on Vishwas Nangare Patil

Raj Thackeray on Vishwas Nangare Patil

मुंबई तक

27 Jun 2026 (अपडेटेड: 27 Jun 2026, 11:16 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

“...तर सेवेचा राजीनामा द्या आणि”,

point

राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना सुनावलं

Raj Thackeray on Vishwas Nangare Patil, मुंबई : काही दिवसांपूर्वीच नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात सहभाग घेत RSS चे कौतुक केले. यावरुन मोठा राजकीय वाद सुरु झालाय. विश्वास नांगरे पाटील यांनी RSS चे कौतुक केल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना चांगलंच सुनावलं. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना सद्सद्विवेक  वापरण्याचा सल्ला दिलाय. नांगरे पाटील काय म्हणाले होते? राज ठाकरे आणि काँग्रेसने त्यांच्यावर कोणत्या शब्दात टीका केलीये? जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

हेही वाचा : गर्लफ्रेंडच्या भावाला बॉयफ्रेंडने 40 अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवले, सकाळी दोघांची बॉडी सापडली

विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले होते? 

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ... 1925 मध्ये एका दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी या संघटनेचा पाया रचला. गेल्यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाली, याच निमित्ताने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे त्रिपाठीजी आणि हंसाजी यांनी अगदी शुद्ध हिंदीत भाषण केले, माझी हिंदी मात्र तोडकीमोडकी हिंदी आहे.", असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले होते. 

दरम्यान, या नांगरे पाटलांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने तो एक्सवर शेअर करत त्यांच्यावर जोरदार टीका केली."शासकीय सेवेत असताना अशाप्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले", अशा शब्दात काँग्रेसने नांगरे पाटलांबाबत भाष्य केलं होतं.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विश्वास नांगरे पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे या वादाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी 

आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच  आहेत . आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !

अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल. 

नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं . 

नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ? 

२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ? आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?

नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !