Archana Patil Interview, गणेश जाधव : "मी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे कुठेतरी कमी पडली असेन. मात्र, त्या निवडणुकीत लोकांनी महायुतीच्या विरोधात मतदान केलं होतं. मग तो कांद्याचा प्रश्न असो किंवा संविधान बदलाचा असो.. धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मुस्लिम मतदार आहेत. या मुस्लिम मतदारांनी परदेशातून दुबई वगैरेमधून येऊन मतदान केलं. पैसे वगैरे कुठलेच न काही न घेता रांगा लावून त्यांनी मतदान केलं होतं. त्यांनी आघाडीच्या ओमराजे निंबाळकरांना केलं होतं. त्यांच्यावर हा अन्याय झाला. मला डावल्यामध्ये तो मेजर विषय होता", असं धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या. त्या मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 20 तास काम, जनावरांचं खाद्य अन् मृत्यू, 'या' 12 कामगारांसोबत मालकाने काय केलं?
ओमराजेंच्या प्रवेशाने महायुतीचे प्राबल्य वाढणार - अर्चना पाटील
अर्चना पाटील म्हणाल्या,ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाने जिल्ह्यातील महायुतीचे प्राबल्य वाढणार आहे. त्यांचं स्वागत आहे. झालीये ती चांगली गोष्ट झालीये. आमच्यामध्ये पारंपारिक लढत आणि घराण्यांचा वाद याच्याशी लोकांना देणं-घेणं नसतं. विकास करु शकेल, असा उमेदवार लोकांना निवडून द्यायचा असतो. मी पराभूत झाले, मला लोकांनी पसंत केलं नाही. आमचा पारंपारिक वाद हा योगायोग झाला. ती केवळ दोन उमेदवारांमधील लढत होती, असंही पाटील यांनी नमूद केलं.
हेही वाचा : 20 तास काम, जनावरांचं खाद्य अन् मृत्यू, 'या' 12 कामगारांसोबत मालकाने काय केलं?
"योग्य समन्वय असेल तर निधी मिळवणे शक्य"
पुढे बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या की, खासदाराचे काम केवळ लोकांमध्ये लोकप्रिय ठरणारे उपक्रम करणे नसून, दिल्लीतून मोठा निधी आणून जिल्ह्याचा विकास करणे हे अपेक्षित असते. महायुतीचे सरकार केंद्र आणि राज्यात असल्याने विकासकामांना वेग मिळू शकतो, हे आता स्पष्ट झाले आहे. ओमराजे निंबाळकर यांनीही हा मुद्दा स्वीकारून महायुतीत प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निकालांमुळे पक्षबदल झाला का? या प्रश्नावर त्यांनी त्यामागची कारणे संबंधितांनीच सांगावीत, असे उत्तर दिले. मात्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे विकासकामांना चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तुळजापूर मंदिरासह विविध विकासकामांचा उल्लेख करत, योग्य समन्वय असेल तर निधी मिळवणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
2029 च्या लोकसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर अर्चना पाटील यांनी उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात, त्यामुळे त्यावर आत्ताच भाष्य करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. महायुतीचा उमेदवार कोणताही असो, भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, तरी त्याच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपमध्ये राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी व्यक्ती, अशी शिकवण असल्याचे सांगत वैयक्तिक किंवा घराण्यांतील वाद विकासाच्या आड येऊ नयेत, असेही त्या म्हणाल्या. ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली तरी त्यांच्यासाठीही प्रचार करू, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
निधी मंजुरी आणि त्यावरील श्रेयवादाच्या प्रश्नावर बोलताना अर्चना पाटील यांनी विविध विकासकामांसाठी आवश्यक प्रस्ताव यापूर्वीच पाठविण्यात आले होते, असे सांगितले. ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून आणखी निधी मिळत असेल तर त्याचेही स्वागत असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून विकासकामांसाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर पाठपुरावा करत असल्याचंही त्या म्हणाल्या. महायुती अधिक मजबूत करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
ADVERTISEMENT











