नवी दिल्ली: महाराष्ट्रात सध्या महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये काहीच आलबेल नाही. दोन्ही पक्ष एकमेकांचे नेते फोडून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करत आहे. पण याच गोष्टींची थेट तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता अमित शाह यांच्याकडे केली असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं आहे. पण अमित शाह यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी मात्र आपण अशी कोणतीही तक्रार केली नसल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
बिहारच्या शपथ विधी सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण थेट बिहारला जाण्याआधी वाट वाकडी करत शिंदेनी आधी दिल्ली गाठली आणि शाहांची भेट घेतली.
या भेटीनंतर शिंदे म्हणाले की, 'तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा हा एकनाथ शिंदे नाहीए. हा रडणारा नाही तर लढणारा आहे.' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे महाराष्ट्र भाजप नेतृत्वाची तक्रार केली नसल्याचा दावा यावेळी केला.
दिल्लीत पत्रकारांच्या थेट प्रश्नांना एकनाथ शिंदेंचं नेमकं काय उत्तर?
'बिहारमध्ये उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याचं निमंत्रण मलाही आहे. त्यामुळे त्याआधी बिहारच्या यशाचं अभिनंदन करण्यासाठी मी गृहमंत्री अमित शाहांना भेटलो.. अतिशय चांगली चर्चा झाली, त्यांचं अभिनंदन केलं.'
हे ही वाचा>> Inside स्टोरी: फडणवीसांची तक्रार थेट अमित शाहांकडे? 50 मिनिटांत शिंदेंनी शाहांना सांगितल्या 'या' गोष्टी
प्रश्न: बिहारमध्ये NDA च्या एकजुटीमुळे विजय मिळाला, पण महाराष्ट्रात NDA भांडताना दिसतेय.
एकनाथ शिंदे: तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा हा एकनाथ शिंदे नाहीए. हा रडणारा नाही तर लढणारा आहे. ते तुम्ही वेळोवेळी पाहिलं आहे. त्यामुळे या छोट्यामोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो.
प्रश्न: मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्यांनी बहिष्कार टाकला, आणि आज लगेच तुम्ही अमित शाहांकडे पोहचले आहात?
एकनाथ शिंदे: अरे... हा सगळा तुमचा कल्पनाविलास आहे. हे सगळं तुम्ही पतंग उडवत असता. आतमध्ये मी बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत. मी एवढंच सांगतो की, ज्या नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो.
हे ही वाचा>> ‘ज्या’ उल्हासनगर प्रकरणावरून CM फडणवीस शिवसेना मंत्र्यांवर संतापले ‘ते’ नेमकं आहे तरी काय?
त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बसलो चर्चा झाली. त्यामधून एवढंच ठरलं की, महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाही. याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाने दिल्या पाहिजे. अशा प्रकारची चर्चा झाली. त्यामुळे तो विषय तिकडे संपलेला आहे. तो दिल्लीचा विषय नाही.
प्रश्न: नाराजी दूर झाली का?
एकनाथ शिंदे: हा विषय इथे नव्हताच मुळात.. तो विषय जो होता महाराष्ट्र स्तरावरचा आणि स्थानिक पातळीवरचा होता. तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय नाही.
प्रश्न: रवींद्र चव्हाण, गणेश नाईक यांच्याकडून तुम्हाला सातत्याने आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातो, त्याकडे कसं बघता?
एकनाथ शिंदे: याबाबत त्यांचे जे पक्ष श्रेष्ठी असतील ते तो निर्णय घेतील.
प्रश्न: रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीने तुम्च्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे...
एकनाथ शिंदे: अरे झालं ना काल ते.. विषय संपला तो. तो विषय दिल्लीत नाही, तुम्ही आता दिल्लीत आहात की मुंबईत आहात? त्यामुळे तो विषय काल संपलेला आहे. त्या विषयाला मी एवढं गांभीर्याने घेत नाही, घेणार नाही.
मुख्यमंत्री होते काल तिकडे.. मुख्यमंत्री हे भाजपचे महाराष्ट्रातील नेते आहेत आणि मी शिवसेनेचा नेता आहे. त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना जे काही सांगायचं ते ठरलेलं आहे. महायुती मजबुतीने निवडणुकींना सामोरी जातेय. महायुतीला विधानसभेत जसं यश मिळालं तसंच आताही यश मिळेल.
शिवसेना मंत्री रुसले, फडणवीस संतापले... शिंदे शाहांच्या घरी आले! सगळी क्रोनोलॉजी जशीच्या तशी...
- भाजप नेते फोडते म्हणून शिवसेनेचे मंत्री रुसले अन् CM फडणवीसांकडे गेले!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मुद्दामहून गैरहजर राहत बहिष्कार टाकला होता. याचे मुख्य कारण भाजपकडून डोंबिवलीत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची मोठ्या प्रमाणात फोडाफोडी केली जात असल्याचा आरोप आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते, मात्र शिवसेनेचे इतर महत्त्वाचे मंत्री अनुपस्थित होते. बैठकीनंतर हे संतप्त मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि भाजपच्या या ‘नेते फोडण्याच्या’ धोरणाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
- शिवसेना मंत्र्यांवरच CM फडणवीस संतापले!
दरम्यान, शिवसेना मंत्र्यांचा असा होरा होता की, एकत्रपणे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली तर फोडाफोडीच्या राजकारण भाजपकडून शिथील होईल. पण झालं मात्र त्याच्या विरुद्धच..
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तक्रार अतिशय कठोरपणे हाताळली. त्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना ठणकावून सांगितले की, “उल्हासनगरमध्ये तुम्हीच (शिवसेनेने) अशीच फोडाफोडी सुरू केली होती. आता दोन्ही पक्षांनी शिस्त पाळली पाहिजे. परस्परांमधील नेते फोडणे आता थांबले पाहिजे.” त्यामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
- दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी गाठली दिल्ली, थेट शाहांच्या घरी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांनाच खडे बोल सुनावल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अगदी दुसऱ्याच दिवशी तडकाफडकी राजधानी दिल्ली गाठली. ज्यानंतर पुढच्या काही तासातच त्यांनी अमित शाहांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट देखील घेतली.
आता याच भेटीत एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे राज्यातील भाजप नेतृत्वाबाबत तक्रार केली असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.
ADVERTISEMENT











