ठाणे: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (12 जानेवारी) शिवसेना ubt आणि मनसेची शेवटची संयुक्त सभा ही ठाण्यात पार पडली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न पाहायला मिळाला. भाजप नेते अण्णामलाई हे मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणालेच नाही.. असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. त्याचाच व्हिडिओ राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेत दाखवत फडणवीसांवर तुफान टीका केली.
ADVERTISEMENT
अण्णामलाई मुंबईत येऊन म्हणालेले की, "मुंबई ही एकमेव अशी जागा आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे - केंद्रात मोदीजी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि महापालिकेत भाजप महापौर. कारण बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट ७५,००० कोटी रुपये आहे, जो छोटा आकडा नाही. चेन्नईचे बजेट केवळ ८,००० कोटी आणि बंगळुरूचे १९,००० कोटी आहे. विकासासाठी चांगले प्रशासक हवेत." असं विधान अण्णामलाई यांनी केलं होतं.
पण त्यांनी मुंबईबाबत असं विधान केलंच नाही असा दावा आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. पाहा याचबाबत भाषणात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
राज ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका
'देवेंद्र फडणवीस जेव्हा आला तेव्हा बरा वाटायचा माणूस मला.. आता काय झालंय माहीत नाही. आतापर्यंत बरा होता.. काल जे मी बोललो ना ती रसमलाई आली होती.. तो सांगतोय की, मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही. हे स्वत: सांगतोय.. आणि फडणवीस सांगतायेत तो असा काही बोललाच नाही.'
'त्याचा तो अर्थच होत नाही.. मला असं वाटायचं की, फडणवीसांना इंग्रजी कळतं. पण कसंय खोटं बोलत राहायचं, खोटं बोलत राहायचं.. त्यांना वाटतं लोकांना खोट्याचं खरं करता येतं. नाही होणार आता.. मला आताच सकाळी कोणी तरी त्याची क्लिप पाठवली होती. लाव रे ते..'
'व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, 'मुंबई ही महाराष्ट्राची नाही असं कुठे म्हटलंय? असं नाहीए.. त्यांनी म्हटलंय मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. ते खरंच आहे. आंतरराष्ट्रीय शहरच आहे. त्यात काय वाईट आहे. महाराष्ट्राचं शहर नाही असं बिल्कुल नाही म्हटलंय. नाही नाही.. तसा त्याचा अर्थच नाही.'
'तो बोलतोय हा मुंबई महाराष्ट्राची नाही.. हे म्हणतात.. तो असं बोललाच नाही. किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा. कोणासाठी करतायेत, कशासाठी करतायेत.. म्हणून मी काल म्हटलं ना. हे फक्त हातावर बसलेले ससाणे आहेत. आमचीच लोकं आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायेत.' असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना घणाघाती टीका केली.
ADVERTISEMENT











