Indapur Nagarpalika Election Result : इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे उलटवून टाकणारा निकाल समोर आला आहे. अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता भरणे यांच्या उमेदवाराने बाजी मारत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांना मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या लढतीत अजित पवार गटाचे भरत शहा यांनी अवघ्या 120 मतांच्या फरकाने विजय मिळवत राजकीय ताकद सिद्ध केली आहे.
ADVERTISEMENT
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भरत शहा यांनी प्रतिस्पर्ध्यांचा कडवा सामना करत अखेर विजय खेचून आणला. या विजयामागे आमदार दत्ता भरणे यांची ठोस साथ निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापुरात आपली पकड मजबूत करत एकूण 14 नगरसेवक निवडून आणले आहेत. यामुळे नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्या गटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यांच्या समर्थक उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. विशेषतः प्रदीप गारतकर यांचा पराभव हा या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गारतकर यांना हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचा पाठिंबा होता, मात्र तो मतपेट्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी तिघांनाही पराभवाची चव चाखावी लागली.
इंदापूर नगरपरिषदेत एकूण निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करत 15 उमेदवार विजयी केले आहेत. तर कृष्णा भीमा विकास आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे नगरपरिषदेत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती भक्कम झाली आहे. नगराध्यक्षपदावरही राष्ट्रवादी काँग्रेसचेच भरत शहा विराजमान झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडणुकीचा निकाल इंदापूरच्या राजकारणात दूरगामी परिणाम करणारा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे दत्ता भरणे यांची स्थानिक पातळीवरील पकड अधिक मजबूत झाली आहे, तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः भाजपसाठी हा निकाल धक्कादायक मानला जात असून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा इशारा असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. एकूणच, इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध करत विरोधकांना धक्का दिला असून, भरत शहा यांच्या विजयामुळे अजित पवार गटाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











