नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्य ठार झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याने स्वतः याची पुष्टी केली आणि सांगितले की, भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि चार जवळचे सहकारी मारले गेले आहेत.
ADVERTISEMENT
या हल्ल्यानंतर, मसूद अझहर म्हणाला की, 'या हल्ल्यात मी पण मारला गेला असता तर बरे झाले असते.' जैश-ए-मोहम्मदने एका निवेदनात म्हटले आहे की, "मौलाना कशफ यांचे संपूर्ण कुटुंब, मौलाना मसूद अझहर यांच्या मोठ्या बहिणीसह मारले गेले आहे आणि मुफ्ती अब्दुल रौफ याची नातवंडे, बाजी सादिया हिचा पती आणि त्याच्या मोठ्या मुलीची चार मुले जखमी झाली आहेत. बहुतेक महिला आणि मुले मारली गेली आहेत."
हे ही वाचा>> निष्पापांचे बळी घेणाऱ्या मसूद अजहरचं संपूर्ण कुटुंब ठार, Air Strike मध्ये कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू
हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अझहरच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या व्यक्तींना आज दफन करण्यात येईल.
आज (7 मे) मध्यरात्रीच्या सुमारास भारतीय सशस्त्र दलांनी पंजाबमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला असलेल्या वहावलपूरसह नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, 'भारताची कारवाई केंद्रित, जबाबदारपणे आणि चिथावणीखोर नव्हती.' ते म्हणाले की, पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता.
हे ही वाचा>> 450 किमीची रेंज, बंकर्सही फोडतं... एअर स्ट्राईकमध्ये भारताने वापरलेलं 'स्काल्प आणि हॅमर' कसं काम करतं?
ऑपरेशन सिंदूर नेमकं कसं पार पडलं?
दरम्यान, या ऑपरेशनविषयी भारतीय लष्कराच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यामध्ये कर्नल सोफिया कुरैशी यांनी नेमकी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, 'भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे 2025 च्या रात्री 1.05 ते 1.30 दरम्यान 'ऑपरेशन सिंदूर' पार पडलं. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईत लष्करी तळांना किंवा सामान्य लोकांना लक्ष्य करण्यात आले नाही. नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले."
तत्पूर्वी, संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि निर्देशित केले जात होते. एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले."
ADVERTISEMENT
