शिंदेंनी शेवटच्या क्षणी फॉर्म दिलेल्या ज्योती वाघमारे कोण आहेत? कशी मिळाली राज्यसभेची उमेदवारी?

Jyoti Waghmare Profile : सोलापूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कष्टकरी कुटुंबातून येऊन उच्चशिक्षणाच्या जोरावर समाजकारणात ठसा उमटवणाऱ्या डॉ. वाघमारे सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत. डॉ. ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणूनही काम केले.

Jyoti Waghmare Profile

Jyoti Waghmare Profile

मुंबई तक

05 Mar 2026 (अपडेटेड: 05 Mar 2026, 02:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंग्रजीत PhD, कन्नड-तेलगुसह 5 भाषांवर प्रभुत्व,

point

आंबेडकरवादी चळवळीतही काम; ज्योती वाघमारे कोण आहेत?

Jyoti Waghmare Profile : महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपकडून महाराष्ट्रातून चार उमेदवार देण्यात आल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील उमेदवारांच्या नावाची चर्चा पुढे येऊ लागली आहे.  शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी प्राध्यापक ज्योती वाघमारे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सुरुवातीला माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती समोर येत असून आता ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यापासून पक्षाची वैचारिक भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाची बाजू ठामपणे मांडली आहे.

हे वाचलं का?

विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारीही ज्योती वाघमारे यांनी सातत्याने पार पाडली आहे. आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वामुळे त्या शिंदे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राजकीय आव्हान उभे करण्याच्या दृष्टीनेही ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच या चर्चाना अंतिम स्वरूप मिळणार आहे.

कोण आहेत ज्योती वाघमारे?

सोलापूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कष्टकरी कुटुंबातून येऊन उच्चशिक्षणाच्या जोरावर समाजकारणात ठसा उमटवणाऱ्या डॉ. वाघमारे सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत. डॉ. ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणूनही काम केले. मात्र, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सोलापूरच्या जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले. वडिलांचा हाच सामाजिक वारसा ज्योती वाघमारे यांनी पुढे चालवला.

दहावीच्या परीक्षेत 84% गुण मिळवणाऱ्या डॉ. वाघमारे यांनी 12 वीमध्ये पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. इंग्रजी साहित्यात पीएचडी (PhD) प्राप्त केलेल्या डॉ. वाघमारे यांना महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनासाठी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारही मिळाला आहे. त्यांचं मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांवर प्रभुत्व आहे.

सामाजिक चळवळ ते राजकारण

अधिव्याख्याता म्हणून 10 वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव असलेल्या डॉ. वाघमारे यांनी आपल्या कार्याची सुरुवात मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतून केली. काही काळ त्यांनी वृत्त निवेदिका म्हणूनही काम पाहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात व्याख्याने दिली आहेत.

राजकीय प्रवासाचा विचार करता, एप्रिल 2023 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाने त्यांच्यातील वक्तृत्व आणि अभ्यासू वृत्ती ओळखून त्यांची राज्य प्रवक्तेपदी आणि धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली. शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यांमध्ये त्यांनी केलेली भाषणे प्रचंड गाजली. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांची आक्रमक आणि अभ्यासपूर्ण शैली चर्चेचा विषय ठरली आहे.

शिवसेनेचा अभ्यासू चेहरा

डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख केवळ एक प्रवक्त्या इतकीच मर्यादित नाही, तर त्या राज्यघटना आणि आंबेडकरी विचारांच्या गाढ्या अभ्यासक आहेत. आगामी काळात संसदेत किंवा विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळाल्यास, त्यांच्या अभ्यासू मांडणीचा फायदा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

6 महिन्यांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेली तरुणी घरी परतली; पण मध्यरात्री झाडाखाली आढळले दोघांचे मृतदेह...
 

    follow whatsapp