मुंबई: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवार हे अडचणीत आलेले असताना या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता या प्रकरणी माध्यमांशी बोलताना मोठी माहिती दिली आहे. 'हा जमीन व्यवहार पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही.' असं अजित पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
पुण्याच्या जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवारांनी दिली मोठी माहिती, पार्थ पवारांना धक्का
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (7 नोव्हेंबर) माध्यमांसमोर येऊन या संपूर्ण प्रकरणी त्यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट केलं. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'या व्यवहाराबाबत मला अजिबात काही माहिती नव्हतं. माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं की, मला विचारून व्यवहार झालेला आहे. माझ्या जवळच्या लोकांनी जर कोणी व्यवहार केला तर त्यांना मी सांगत असतो की, संपूर्ण गोष्ट नियमाला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे.'
'आता या व्यवहाराबाबत मी जी माहिती घेतली.. त्यामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री नागपूरला होते. त्यांच्याशी मी फोनवर संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की, जरी माझ्या घरातील जवळच्यांशी संबंधित असलेला हा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावं लागेल, चौकशी करावी लागेल. काय तुमच्या मनामध्ये समिती नेमायची असेल.. जे काही करायचं असेल ते करा. माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील.'
'शेवटी आरोप करणं सोप्पं असतं. पण त्या आरोपातील वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला कळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं.'
'तुमच्या एक लक्षात येईल की, या व्यवहारात एक रुपया देखील दिला गेला नाही. तरी मोठे-मोठे आकडे सांगितले गेले. विरोधकांनी पण आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.'
'परंतु आज संध्याकाळी मला कळालं की, ते जे काही कागदपत्रं होते ते सगळे रद्द करण्यात आले आहेत. जो काही व्यवहार झालेला होता तो रद्द करण्यात आला आहे. दुसरी गोष्ट राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त यांची समिती जाहीर करण्यात आली आहे.' असं अजित पवार यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT











