पोलिसांनी मुंबईतील आंदोलनाची परवानगी नाकारली, आता मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

14 Sep 2026 (अपडेटेड: 14 Sep 2026, 10:05 AM)

Manoj Jarange Patil Interview : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव आणि कायदा-सुव्यवस्थेचा दाखला देत परवानगी नाकारण्यात आली असून, यानंतर जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी मुंबईतील आंदोलनाची परवानगी नाकारली

point

आता मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil Interview : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान पोलिसांकडून यासंदर्भातील पत्र देण्यात आले असून, गेल्या वर्षीच्या आंदोलनात नियम आणि अटींचा भंग झाल्याचा दाखला देण्यात आला आहे. तसेच सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण पोलिसांनी दिले आहे. जरांगे पाटील यांच्या टीमकडून आंदोलनासाठी रीतसर अर्ज आणि हमीपत्र सादर करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला अधिकृत परवानगी देण्यास नकार दिला आहे. या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत सरकारवर आणि प्रशासनावर जोरदार टीका केली.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या आगमनादिवशी वरुणराजाची दमदार हजेरी, IMD चा अलर्ट

वकिलांची टीम पुढील निर्णय घेणार,मनोज जरांगेंचा इशारा 

परवानगी नाकारल्यानंतरही 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून जाणूनबुजून द्वेषाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे सांगत, गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात परवानगी देण्यात आली होती, मग यंदाच परवानगी का नाकारण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायालयाने सांगितलेले नियम पाळून आपण आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाची परवानगी नाकारण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत, याप्रकरणी आपल्या वकिलांची टीम पुढील निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : जरांगेंना मुंबईत नो-एन्ट्री? परवानगी नाकारत पोलिसांनी काय सांगितलं?

आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाल्यास मराठा समाज आक्रमक होणार

मनोज जरांगे पाटील यांनी या मुलाखतीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. आंदोलन मोडण्यासाठी वेगवेगळे विषय पुढे केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी परिसरातील चौकशी आणि इतर कारवायांचा उल्लेख करत, या चौकशा आंदोलनाच्या काळातच का केल्या जात आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जालना जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांनी आवाहन केले. आंदोलनाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी पावले उचलू नयेत, असे ते म्हणाले. तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाल्यास मराठा समाज आणखी आक्रमक होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

परवानगी नाकारली असली तरी मुंबईला जाण्याचा निर्णय बदलणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. 15 सप्टेंबरला मुंबईकडे निघणार असून 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सलाईन, पाणी आणि उपचारही घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. यापूर्वी उपोषणाच्या काळात सलाईन घेतल्याचा उल्लेख करत आता ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने कितीही दबाव आणला तरी आपण मागे हटणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. न्यायालय आणि कायद्याच्या नियमांचे पालन करून आंदोलन करणार असल्याचे सांगताना, सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली तरी मुंबईला जाण्याचा निर्णय पक्का असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.