ग्राउंड रिपोर्ट: सोलापुरात कोण जिंकणार? जयकुमार गोरे, मोहितेंचं नाव घेत लोकं बोलले रोखठोक!

सोलापूर विधान परिषद निवडणूक विविध कारणांनी आणि राजकीय घडामोडींमुळे विशेष चर्चेत आहे. मात्र सोलापूरच्या नागरिकांना येथे सुरू असलेल्या राजकारणाबाबत काय वाटतंय हेच मुंबई Tak ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

mlc election ground report who will win in solapur people spoke candidly mentioning names of jaykumar gore and dhairyasheel mohite patil

फाइल फोटो

मुंबई तक

• 07:00 AM • 11 Jun 2026

follow google news

नितीन शिंदे, सोलापूरः सध्या राज्यभर विधान परिषद निवडणुकीची चर्चा रंगली आहे. त्यामध्ये सोलापूर विधान परिषद निवडणूक विविध कारणांनी आणि राजकीय घडामोडींमुळे विशेष चर्चेत आहे. या निवडणुकीकडे पंढरपूरमधील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक कसे पाहतात, त्यांच्या भावना आणि अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.

हे वाचलं का?

सोलापूरचा ग्राऊंड रिपोर्ट

एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, विधान परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या प्रतिनिधींची निवडणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडून जाणे आवश्यक आहे. मात्र सध्या निवडणूक व्यक्ती आणि पक्षांभोवती फिरताना दिसत असून स्थानिक प्रश्न दुय्यम ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी लढणारा आणि प्रश्न मांडणारा उमेदवार निवडून जाणे गरजेचे आहे.

राजकीय गणिताबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे संख्याबळ असल्याने महायुतीची बाजू मजबूत दिसत आहे. मात्र निवडणुकीत लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही. नीट परीक्षेचा प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दुसऱ्या एका नागरिकाने निवडणुकीचे चित्रण करताना म्हटले की, एका बाजूला पैशाची ताकद आणि दबावाचे राजकारण आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणाची लढाई आहे. मतदानाचा अधिकार नसला तरी हे मतदार जनतेनेच निवडून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा विचार करून प्रामाणिक आणि लोकाभिमुख उमेदवाराला संधी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निवडणुकीच्या स्वरूपाबद्दल बोलताना आणखी एका नागरिकाने सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हे सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे सुजाण लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी निवडणूक केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता महागाई, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पाहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी केवळ मतांची जुळवाजुळव न करता, निवडून आल्यावर कोणत्या प्रश्नांसाठी काम करणार आहेत, याची स्पष्ट भूमिका जनतेसमोर मांडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाबद्दल बोलताना एका नागरिकाने लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित केले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली तरी ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी नाही, असे त्यांचे मत होते. त्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बाहेरचे असल्याने स्थानिक राजकारणात वेगवेगळे समीकरण निर्माण झाले आहेत. सत्ताधाऱ्यांकडे संख्याबळ असले तरी विरोधी उमेदवार स्थानिक लोकांमध्ये मिसळणारा आणि जनतेशी जोडलेला असल्यामुळे लढत रंगतदार होऊ शकते.

महाविकास आघाडीतील काही नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या उमेदवारांकडे झुकत असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, एका नागरिकाने दलबदलू राजकारणावर टीका केली. मात्र कोणताही उमेदवार निवडून आला तरी त्याने सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई, रोजगाराचा प्रश्न तसेच पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा यांसारख्या धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्रांच्या विकासासाठी काम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

इतिहासाचा संदर्भ देताना आणखी एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, सोलापूर विधान परिषद निवडणुकांमध्ये अनेकदा कमी संख्याबळ असलेल्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे केवळ आकड्यांवरून निकालाचा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही. त्यांनी खंत व्यक्त केली की, पूर्वी विचारप्रधान आणि बौद्धिक क्षेत्राशी संबंधित मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत आता मॅन पॉवर, मसल पॉवर आणि मनी पॉवरचा प्रभाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे मतदारांनी सुज्ञपणे निर्णय घेण्याची गरज आहे.

चर्चेच्या शेवटी एका नागरिकाने मत व्यक्त केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मतदान करताना पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीची प्रतिमा, कामाचा अनुभव आणि राजकारणातील स्वच्छता यांना प्राधान्य द्यावे. पक्षीय मर्यादांच्या पलीकडे जाऊन सोलापूर जिल्ह्याच्या हिताचा विचार करून मतदान झाले, तरच लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ होईल.

एकूणच पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहता, या निवडणुकीत केवळ राजकीय गणित नव्हे तर विकास, प्रामाणिक नेतृत्व आणि स्थानिक प्रश्नांनाही महत्त्व मिळावे, अशी अपेक्षा जनतेची असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.