Mumbai Mahanagar Palika election Results : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने काठावरचे बहुमत मिळवलंय. दुसरीकडे ठाकरे बंधूंना पराभव स्वीकारावा लागलाय. गेल्या 25 वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेची महापालिकेवर सत्ता होती. मात्र, आता ही सत्ता हातातून गेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 2025–26 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना मिळालेली अधिकृत मते आणि त्यांची टक्केवारी समोर आली असून, या निकालातून मुंबईतील राजकीय समीकरणे स्पष्टपणे दिसून येत आहेत. महापालिका निवडणुकीत एकूण 54,64,412 वैध मते नोंदवली गेली, तर 11,677 मते टपाली मतदानाद्वारे पडली आहेत. यापैकी विविध पक्षांच्या विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या आणि टक्केवारी महत्त्वाची ठरली आहे.
ADVERTISEMENT
भाजपला सर्वाधिक मतं, मुंबईतील 21.58 मतदार पाठीशी
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (भाजप) सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे 89 उमेदवार विजयी झाले असून, त्यांना एकूण 11,79,273 मते मिळाली आहेत. एकूण मतदानाच्या तुलनेत भाजपला 21.58 टक्के मते मिळाली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला 7 लाख 17 हजार 736 मतं; एकूण टक्केवारी 13.13
दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) राहिली आहे. या गटाचे 65 उमेदवार विजयी झाले असून, त्यांना 7,17,736 मते मिळाली आहेत. हे प्रमाण एकूण मतदानाच्या 13.13 टक्केआहे. मुंबईत शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव अजूनही कायम असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
शिवसेना शिंदे गटाला 5 टक्के मतदान
शिवसेना (शिंदे गट) तिसऱ्या क्रमांकावर राहिली असून, या पक्षाचे 29 उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे गटाला 2,73,326 मते मिळाली असून, एकूण मतदानाच्या 5 टक्के मते मिळवण्यात यश आले आहे.
इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत 24 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला एकूण 2,42,646 मते मिळाली असून, मतदानातील वाटा 4.44 टक्के आणि विजयी मतांपैकी 9.31 टक्के इतका आहे.
दरम्यान, चर्चेत असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या निवडणुकीत 6 जागांवर विजयी झाली आहे. मनसेला एकूण 74,946 मते मिळाली असून, ही मते एकूण मतदानाच्या 1.37 टक्के आहेत. विजयी उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांपैकी मनसेचा वाटा 2.87 टक्के आहे. मर्यादित जागा मिळाल्या असल्या तरी मनसेची उपस्थिती मुंबईच्या राजकारणात कायम असल्याचे दिसते.
याशिवाय, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ला 8 जागा आणि 68,072 मते (1.25 टक्के), नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला 3 जागा आणि 24,691 मते, समाजवादी पार्टीला 2 जागा आणि 15,162 मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटला 1 जागा आणि 11,760 मते मिळाली आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











