Mumbai Mahanagar Palika Election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अशातच शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप उर्फ अप्पा राऊत यांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छेमुळे विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 11 चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेष म्हणजे हाच वॉर्ड राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आग्रहीपणे मागत असल्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये याबाबत मोठा पेच निर्माण झालाय.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांचे बंधू कोणत्या वार्डातून निवडणूक लढण्यास इच्छुक
विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 111 हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)साठी महत्त्वाचा मानला जात आहे. या वॉर्डमधून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ हे पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच हा वॉर्ड राष्ट्रवादीच्या वाट्याला यावा, यासाठी पक्षाकडून दबाव आहे. मात्र, आता संदीप राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याच वॉर्डमधून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे संकेत दिल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाबाबत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)सोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीला अपेक्षित असलेल्या बहुतेक जागा देण्यात आल्याचे सांगत, “जयंत पाटील यांचे समाधान आम्ही करू शकलो,” असा दावा राऊत यांनी केला. मात्र, या प्रक्रियेत शिवसेनेच्या काही मजबूत जागा गेल्याचेही त्यांनी मान्य केले.
मनसेला ‘सिटिंग’ जागा देण्यात आल्यामुळे शिवसेनेतील काही कार्यकर्ते नाराज असल्याचेही राऊत यांनी सूचित केले. मात्र, “आघाडी आणि युतीत सर्वांनाच समाधानी ठेवता येत नाही. मुंबईचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडलेला आहे,” असे ते म्हणाले. संदीप राऊत यांच्या उमेदवारीविषयी विचारले असता, “मला माहिती नाही,” असे उत्तर देत त्यांनी या मुद्द्यावर थेट भाष्य टाळले.
महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे युती निश्चित असून राष्ट्रवादीसोबतही चर्चा सुरू असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. ठाकरे बंधूंच्या युतीत राष्ट्रवादी शरद पवार गट सहभागी होणार का, याबाबतही हालचालींना वेग आला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात बैठकीला सुरुवात झाली असून, सुरुवातीला शरद पवार गटाला 10 जागा देण्याचा प्रस्ताव होता. त्यानंतर तो वाढवून 15 जागांपर्यंत नेण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाला वॉर्ड क्रमांक 111 आणि 119 सह एकूण 16 जागा हव्या असल्याची माहिती आहे. याचवेळी राष्ट्रवादीने काँग्रेससोबतही समांतर चर्चा सुरू ठेवल्याने दबावाची रणनीती आखली असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आज पुन्हा होणार आहे. सकाळी 10 वाजता रंगशारदा येथे भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक होणार असून, त्यात जागांची अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण आणि प्रचाराची रणनीती यावर चर्चा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 10 ते 15 जागांवर उमेदवार बदल आणि समन्वयाची प्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. एकूणच, विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 111 हा केवळ एका उमेदवाराचा प्रश्न न राहता, महाविकास आघाडीतील जागावाटप आणि परस्पर विश्वासाची कसोटी ठरणार असल्याचे सध्याचे राजकीय चित्र सांगते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











