Mumbai Tak Baithak Satej Patil: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. "हा निर्णय झाला, तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ते अत्यंत चांगलं ठरेल आणि हे विलिनीकरण म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं असेल," असं स्पष्ट मत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकीय घडामोडींसह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
पवारांच्या NCP चं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? पाहा सतेज पाटलांचा काय दावा
विलिनीकरणाविषयी बोलताना पुढे पाटील म्हणाले की, 'याआधी राष्टरवादी-काँग्रेस जी आघाडी झाली ती विचारधारेवर होती. त्यामुळे जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर दुधात साखरच आहे. मात्र या विलिनिकरणाविषयीच्या चर्चा दिल्ली स्तरावर होतात. आमचे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्याशी गप्पा मारताना या एकत्र लढूया असं आम्ही म्हणत असतो.'
हे ही वाचा>> 'पीएम मोदी अन् त्यांचं मंत्रिमंडळ अवाक्षर...', राम मंदिरातील अपहारावरुन ठाकरेंची पोस्ट
निधीसाठी संघर्ष
या बैठकीत सतेज पाटील यांनी निधी वाटपातील पक्षपातीपणा, विरोधकांची भूमिका, भाजपची सद्यस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. गेल्या 10-15 वर्षांत राज्यातील निधी वाटपाचा ट्रेंड बदलल्याचा आरोप करत ते म्हणाले की, जिल्ह्याला लोकसंख्येच्या निकषानुसार निधी मिळतो, मात्र सध्या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या हक्काचा आमदार फंड मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. आता प्रशासनसुद्धा चुकीच्या पद्धतीने वागत असून, किमान एक कोटी रुपयांमधील 50 लाख रुपये तरी आमदारांना मिळायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली.
हे ही वाचा>> "ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र.. पंतप्रधान पद", उद्धव ठाकरेंनी उडवून दिली मोठी खळबळ
मविआने कणखर भूमिका घेतली
विरोधी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सतेज पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी एकत्रितपणे सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात संघर्ष करत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन असो की विधीमंडळातील आवाज, मविआचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. विधीमंडळात विरोधकांना बोलू दिले पाहिजे आणि आमच्या किमान दोन लक्षवेधी सूचना तरी पटलावर आल्या पाहिजेत, असा आमचा प्रयत्न असतो. उद्धव ठाकरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त असतानाही जनतेसाठी दौरे करत आहेत. जनता सध्याच्या महायुती सरकारवर प्रचंड नाराज असून, मविआ हाच जनतेला सक्षम पर्याय देत आहे. शक्तीपीठ महामार्ग, वाढती महागाई आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प (SRA) यांसारख्या सरकारच्या धोरणांवर मविआने सातत्याने कणखर विरोधी भूमिका घेतली आहे.
भाजपने आत्मपरीक्षण करावे
भाजपच्या वाढत्या प्रभावावर आणि त्यांच्या रणनीतीवर सतेज पाटील यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच नवीन चेहऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. गाडगीळ, दीप्ती चौधरी यांना विधानपरिषदेवर पाठवून काँग्रेसने कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली, त्यामुळे काँग्रेसने संधी दिली नाही, असा आरोप कोणी करू शकत नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांची चूक झाली हे मान्य करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला की, भाजप आज स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्तेत आलेली नाही. काँग्रेस किंवा इतर पक्षांतून भाजपमध्ये गेलेले नेते स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकतात. त्यामुळे भाजपने आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. स्वतःच्या हिंमतीवर ते सत्तेवर येऊ शकत नाहीत, हीच भाजपची मोठी शोकांतिका आहे.
जनतेने शिक्षा द्यायला हवी
लोकसभेतील महाविकास आघाडीच्या यशाचा उल्लेख करत सतेज पाटील म्हणाले की, सरकारने केलेल्या पाच मोठ्या चुकांसाठी जनतेने लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कानफाडीत मारली आहे. 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे दिल्यानंतर भाऊ अचानक गायब झाला. या सरकारचे अपयश इतके मोठे आहे की, यांनी तब्बल 14 हजार पुरुषांना महिलांच्या योजनेचे पैसे वाटले. नेते ज्या पद्धतीने पक्ष बदलत आहेत ते चुकीचे असले, तरी जनतेने मतातून त्यांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजे.
द्वेष म्हणजे हिंदुत्त्व आहे का?
शेवटी, भाजपकडून केल्या जाणाऱ्या हिंदुत्वाच्या राजकारणावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. लोकांचा द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व आहे का? हा चुकीचा नरेटिव्ह भाजपने देशात सेट केला आहे, असे ते म्हणाले. आम्ही गेल्या 40 वर्षांपासून रामनवमी साजरी करत आहोत, प्रभू श्रीराम आमच्या हृदयात आहेत, पण आमचं हिंदुत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणारं आहे. भाजपचा हा नरेटिव्ह देशासाठी घातक ठरत असून, आज देशात बेरोजगारी आणि एआयमुळे येणाऱ्या आव्हानांवर चर्चा होणे गरजेचे आहे. आजचा तरुण सुशिक्षित असून तो आता सरकारला थेट प्रश्न विचारत आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT












