Dhananjay munde letter to CM Devendra Fadnavis, बीड : मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये ओलिस ठेवण्यात आलेल्या बीड जिल्ह्यातील एका तरुणासह महाराष्ट्रातील इतर तरुणांची तातडीने सुरक्षित सुटका करण्यात यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात मोठ्या पगाराचे आमिष दाखवून तरुणांना परदेशात पाठवले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. धनंजय मुंडे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय? ते सविस्तर जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'सकाळी मला मेसेज पाठवला...', विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?
धनजंय मुंडे यांचं पत्र जसंच्या तसं
उपरोक्त विषयान्वये मी आपले लक्ष एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकाराकडे वेधू इच्छितो. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाट येथील स्वप्नील काळुंके या तरुणासह महाराष्ट्रातील नाशिक, धाराशिव, चाळीसगाव आणि ठाणे येथील अनेक तरुणांना बँकॉकमध्ये नोकरीचे आमिष दाखवून म्यानमार सीमेवर ओलीस ठेवण्यात आले आहे.
सोशल मीडियावरील दरमहा ७० हजार रुपयांच्या नोकरीच्या जाहिरातीला भुलून हे तरुण तिथे गेले होते. मात्र, त्यांना थायलंड-म्यानमार सीमेवरील जंगलात (तथाकथित आयटी पार्क) नेऊन आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या रॅकेटमध्ये अडकवण्यात आले आहे. तिथे या तरुणांकडून जबरदस्तीने १६ ते १८ तास सायबर फसवणुकीचे काम करवून घेतले जात आहे. नकार दिल्यास त्यांना अमानुष मारहाण करणे आणि इलेक्ट्रिक करंटचे झटके देणे असे भयंकर प्रकार घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिथे सुमारे ७०० ते ८०० भारतीय तरुण अडकले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील २० ते २५ तरुणांचा समावेश आहे.
हेही वाचा : 12 वर्षांच्या मुलांचं भयानक कृत्य, शेजाऱ्याचं शीर धडावेगळं करुन नाल्यात फेकलं, कारण काय?
या प्रकरणी बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, राज्याच्या पोलिसांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच, 'आयबी'च्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मात्र, हा आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा विषय असल्याने या तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य शासनाने थेट केंद्र सरकारच्या संपर्कात राहणे अत्यंत आवश्यक आहे. म्यानमारमध्ये अडकलेले हे तरुण मृत्यूच्या दाढेत असून त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत दयनीय आणि चिंताग्रस्त झाली आहे.
तरी, माझी आपणास आग्रहाची विनंती आहे की, आपण राज्याचे प्रमुख या नात्याने स्वतः या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे. राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकार आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडे (Ministry of External Affairs) या तरुणांच्या सुटकेसाठी उच्च पातळीवर कठोर पाठपुरावा करावा. तसेच या मानवी तस्करीमागे असलेल्या महाराष्ट्रातील एजंटांच्या जाळ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून आपले तरुण सुरक्षितपणे मायदेशी परत येऊ शकतील. आपण या विषयात त्वरित आणि सकारात्मक कार्यवाही कराल, हा मला विश्वास आहे.
ADVERTISEMENT











