RSS चं कौतुक केल्यानं काँग्रेससह राज ठाकरेंकडून टीकेची झोड, अखेर नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण

Vishwas Nangare Patil on RSS : RSS च्या कार्यक्रमातील भाषणावरून झालेल्या टीकेनंतर IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच भूमिका स्पष्ट केली. संविधानाशी निष्ठा असल्याचे सांगत त्यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले.

Vishwas Nangare Patil on RSS

Vishwas Nangare Patil on RSS

योगेश पांडे

29 Jun 2026 (अपडेटेड: 29 Jun 2026, 01:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

RSS चं कौतुक केल्यानं काँग्रेससह राज ठाकरेंकडून टीकेची झोड

point

अखेर नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण

Vishwas Nangare Patil on RSS, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे विरोधकांच्या निशाण्यावर आलेले नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अखेर प्रथमच या संपूर्ण वादावर सविस्तर भूमिका मांडली आहे. संघाच्या कार्यक्रमातील त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेससह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यानंतर नांगरे पाटील यांनी आपण संविधानाशी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणे हे आपल्या कर्तव्याचाच भाग असल्याचे सांगितले. ते याबाबत सविस्तर बोलले आहेत. नेमकी प्रतिक्रिया काय दिली? जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'अपघाताची केस मर्डरची कशी झाली?' सियाचे वकील कोर्टात कोणता युक्तीवाद करणार?

 RSS बाबतच्या वक्तव्यावर नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण 

संघाच्या कार्यक्रमाबाबत बोलताना नांगरे पाटील म्हणाले की, सगळ्यांचा आम्हाला आदर आणि सन्मान आहे. मी एक भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी आहे. माझी कटिबद्धता संविधानाशी आणि संविधानिक मूल्यांशी आहे. रुल ऑफ लॉ अबाधित ठेवणे हे माझं कर्तव्य आहे. याठिकाणी (नागपूर) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दिक्षाभूमी देखील आहे. त्यांच्या तत्वांशी आम्ही पाईक होतो, आणि राहणार आहोत. कायद्याचा अंमल ठेवण्याबरोबरच लोकांचं प्रबोधन करणे हे देखील पोलिसांचं काम आहे. त्यामुळे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जाणे आणि तेथील युवकांना, वृद्धांना आणि स्त्रियांना मार्गदर्शन करणे हे आमचे कर्तव्य आहे. अगदी चार दिवसांपासून या विषयावर खूप चर्चा होत आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो. हा कार्यक्रम 19 एप्रिल रोजी सानपाडा येथे झाला होता. याचं निमंत्रण सानपाडा  येथील सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते. डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंट असलेले लोकं माझ्याकडे आले होते.  ते निमंत्रण आजही माझ्याकडे आहे. या कार्यक्रमात महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांना बोलावण्यात आलं होतं. 

मी रमजान, बौद्ध आणि ख्रिश्चन समाजाच्या कार्यक्रमांनाही नियमित उपस्थित राहिलो आहे. हे नित्याचं आहे. मी जात असतो. मी इफ्तार पार्टी आणि रमजान ईदच्या कार्यक्रमांमध्येही बोललो आहे. हा कार्यक्रम कार्यालयीन वेळेनंतर रात्री साडेआठ वाजता झाला होता.  त्या कार्यक्रमात आपण उपनिषदातील एक मंत्र सांगितला, प्रेम आणि सेवा ही आपली संस्कृती असल्याचे मांडले, ज्ञानेश्वरीवरीतील पसायदानाबाबत सविस्तर भाष्य केले. तसेच ड्रग्सविरोधी जनजागृतीवरही बोललो. माझी सिलेक्टिव्ह क्लीप व्हायरल झाली. आपण कोणत्याही नियमाचा भंग केलेला नाही आणि जे काही बोललो ते कायद्याच्या चौकटीत राहूनच बोललो, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंगवर भर देणार - नांगरे पाटील 

विश्वास नांगरे पाटील यांनी पुढे सांगितले की, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार. प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंगवर भर देत लोकांना सोबत घेऊन टीम म्हणून काम करण्याचा प्रयत्न राहील. आमच्या खांद्यावर आयपीएस लिहिलेले आहे, त्याचा अर्थ लोकांची सेवा करणे हा आहे. घाबरायचे असेल तर गुन्हेगारांनी घाबरावे, जनतेने घाबरण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांचा आदर आणि सन्मान राखत माझी कटिबद्धता संविधानाशीच असल्याचेही त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. पुराव्यावर आधारित पोलिसिंगला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचे नमूद करत कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा : माहीम : धक्का लागल्याने चाकू हल्ला, माफी मागूनही विषय मिटला नाही; स्थानकाबाहेर काय घडलं?

यावेळी विश्वास नांगरे पाटलांनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’चाही उल्लेख केला. विद्यार्थ्यांना ड्रग्सपासून वाचवणे हे प्राथमिक कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना पोलिसांच्या उपस्थितीत सुरक्षित वाटणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण आयजी आणि मुंबई पोलीस सहआयुक्त म्हणून काम केले असल्याने त्यांचा रोडमॅप माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यावर भर देणार असून पोलीस कर्मचारी हे माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत, असेही त्यांनी म्हटले. पोलिसांच्या अंगावर कोणी हात टाकला तर तो माझ्यावर हात टाकल्यासारखेच असेल आणि अशा प्रत्येक प्रकरणाला कायद्याच्या चौकटीत राहून कसे हाताळायचे हे मला चांगले माहिती आहे, असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.