मुंबई: अलीकडेच शिवसेना (शिंदे गट) राबवत असलेल्या 'ऑपरेशन टायगर'ची राज्यभर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर या राजकीय मोहिमेची जोरदार चर्चा रंगली. मात्र, याच काळात ठाणे-पालघरमध्ये आणखी एक वेगळी राजकीय मोहीम शांतपणे सुरू होती. ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत घडलेल्या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
ADVERTISEMENT
ही निवडणूक वरवर पाहता एका जिल्हा बँकेची असली, तरी तिच्यामागे महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमधील वाढत्या वर्चस्वाच्या संघर्षाची छाया स्पष्टपणे दिसून आली.
शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण असा सामना
या निवडणुकीत एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. त्यामुळे ही लढत प्रत्यक्षात ठाणे जिल्ह्यातील भाजप विरुद्ध शिवसेना असा रंग घेताना दिसली.
हे ही वाचा>> समजून घ्या: ठाकरेंच्या खासदारांनंतर आता नंबर नगरसेवकांचा? निधी वाटपातला भेदभाव पाहा!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर ठाणे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढत असल्याचा दावा केला जात असताना, या निवडणुकीत शिवसेनेने स्वतःची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
21 पैकी 16 जागांवर सहकार पॅनलचा विजय
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकपदांसाठी निवडणूक झाली. यामध्ये सहकार पॅनलने तब्बल 16 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले.
या निवडणुकीत 'परिवर्तन पॅनल' आणि 'सहकार पॅनल' अशी थेट लढत होती. परिवर्तन पॅनलला महायुतीचे अधिकृत पॅनल मानले जात असले, तरी शिवसेनेला त्यामध्ये पुरेसा सन्मान आणि सहभाग मिळत नसल्याची भावना निर्माण झाली. त्यातूनच शिंदे समर्थकांनी स्वतंत्र सहकार पॅनल उभे केले.
भाजपचे नेते आणि बहुजन विकास आघाडीही शिंदेंसोबत
विशेष म्हणजे या सहकार पॅनलमध्ये भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचाही सहभाग होता. त्याचबरोबर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही या पॅनलला पाठिंबा दिला. यामुळे ही निवडणूक केवळ शिवसेना विरुद्ध भाजप एवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर भाजपमधील नाराज गट आणि स्थानिक राजकीय समीकरणेही यात महत्त्वाची ठरली.
रवींद्र चव्हाणांनी निवडणुकीत घातले विशेष लक्ष
ही निवडणूक स्थानिक असली तरी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्याची चर्चा होती. बैठका, प्रचार आणि रणनीती यामध्ये त्यांचा सहभाग असल्याने भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.
हे ही वाचा>> समजून घ्याः फुटलेले सगळेच खासदार बाद होणार? कोर्टाचाच निर्णय पाहा
याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनीही संपूर्ण ताकद पणाला लावत विविध पक्षांतील नाराज नेत्यांना एकत्र आणण्याची रणनीती आखली.
किसन कथोरे आणि हितेंद्र ठाकूर यांची साथ ठरली निर्णायक
कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यातील मतभेद लक्षात घेऊन शिंदे गटाने कथोरे यांना आपल्या बाजूला आणले. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून झालेल्या राजकीय धक्क्यानंतर बहुजन विकास आघाडीही भाजपवर नाराज असल्याचे चित्र होते.
या नाराजीचा राजकीय फायदा घेत शिंदे गटाने हितेंद्र ठाकूर यांनाही सहकार पॅनलमध्ये सहभागी करून घेतले.
रणनीतीची धुरा नरेश म्हस्के आणि जगदाळे यांच्याकडे
या संपूर्ण निवडणुकीची रणनीती ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि महापालिकेतील सभागृह नेते जगदाळे यांनी सांभाळल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे स्वतः प्रचारात फारसे सक्रिय नसले, तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक लढवण्यात आली. याचा परिणाम म्हणजे सहकार पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला मोठा धक्का दिला.
स्थानिक निवडणूक तरी महत्त्व मोठे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या आर्थिक संस्था आहेत. त्यामुळे या बँकांवरील नियंत्रणाला स्थानिक राजकारणात मोठे महत्त्व असते.
या निवडणुकीत सुमारे 4,021 मतदार होते. त्यापैकी 3,898 जणांनी मतदान केले. सुरुवातीला 21 पैकी 10 संचालक बिनविरोध निवडून आले होते. त्यापैकी आठ संचालक सहकार पॅनलचे होते. त्यामुळे उर्वरित 11 पैकी केवळ तीन जागा जिंकल्या तरी बहुमत मिळणार होते आणि सहकार पॅनलने त्यापेक्षा अधिक जागा जिंकत विजय निश्चित केला.
श्रीकांत शिंदेंचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
निवडणुकीच्या निकालानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.
ते म्हणाले, "कोण कोणावर प्रभाव टाकत होते यापेक्षा कोण कोणाच्या संपर्कात होते हे या निवडणुकीत स्पष्ट झाले. पैशांच्या आमिषाला मतदार बळी पडले नाहीत. सहकार पॅनल कोणत्याही एका पक्षाचे नव्हते, तर बँकेच्या हितासाठी एकत्र आलेल्या सर्व चांगल्या लोकांचे ते पॅनल होते."
महायुतीतील नवीन समीकरणांचे संकेत?
या निकालानंतर महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. ऑपरेशन टायगरनंतर एकनाथ शिंदे केवळ विरोधी पक्षातील नेतेच नव्हे, तर स्थानिक पातळीवर भाजपच्या नाराज गटांनाही आपल्या बाजूला वळवत असल्याचे चित्र या निवडणुकीत दिसले.
बच्चू कडू यांना सोबत घेण्यापासून ते बहुजन विकास आघाडीशी वाढलेल्या जवळीकीपर्यंत अनेक राजकीय घडामोडींची चर्चा सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात हितेंद्र ठाकूर यांच्यासोबतही शिंदे गटाचे राजकीय संबंध अधिक मजबूत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाही. या निकालातून महायुतीतील अंतर्गत स्पर्धा, ठाणे जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरणे आणि एकनाथ शिंदे यांच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीची पुन्हा एकदा प्रचिती आल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा राजकारणाच्या दृष्टीने या निकालाकडे महत्त्वाच्या संकेत म्हणून पाहिले जात आहे.
ADVERTISEMENT











